पान:निर्माणपर्व.pdf/210

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 यानंतरचा घटनाक्रम थोडक्यात असा -

 येथून जवळच असलेल्या रंजाणे या गावी शहाद्याच्या ग्राम स्वराज्य समितीची एक जाहीर सभा होती. या सभेत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी अमळथ्याहून १५।२० दलितमंडळी गेली. दि. १० जानेवारी १९७९. अमळ्थ्याचा हा प्रश्न हाती घ्यायचा, अन्यायाचा प्रतिकार करायचा, असा निर्णय या सभेत घेतला गेला. ग्राम स्वराज्य समिती अमळथा प्रकरणी अशी ओढली गेली. गोविंदराव शिंदे, उल्हास राजज्ञ, प्रभाकर बिरारी वगैरे समितीचे कार्यकर्ते अमळथ्याला मुक्काम टाकू लागले. वृत्तपत्रांकडे माहिती पाठवू लागले. अमळथ्याच्या व आसपासच्या दलितांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेऊ लागले.

 दि. २ फेब्रुवारी : अमळथे येथे जाहीर सभा. समता मोर्चासाठी डॉ. बाबा आढाव, विजय तेंडुलकर वगैरे मंडळी त्या सुमारास या भागात आलेली होती. त्यांनी अमळथ्याला भेट दिली. आढावांचे अमळथा सभेत भाषणही झाले.

 दि. १० फेब्रुवारी : महसूलमंत्री श्री. उत्तमराव पाटील यांची अमळथा गावाला भेट. पूर्वीचे ऋणानुबंध असल्याने ते प्रथम जयसिंगराव पाटलांच्या वाड्यावर थांबले. दलितांना त्यांनी भेटीसाठी निरोप पाठविला. उल्हास राजज्ञ हा ग्राम स्वराज्य समितीचा तरुण कार्यकर्ता त्या वेळी तेथेच होता. त्याने 'पाटलाच्या वाड्यावर दलितमंडळी येऊ शकत नाहीत. तेथे मोकळेपणाने बोलणे होणार नाही, उत्तमरावांनीच दलितवस्तीत येऊन गाऱ्हाणे ऐकावे, प्रश्न समजावून घ्यावा', असा उलट निरोप पाठवला. त्याप्रमाणे उत्तमराव दलितवस्तीत आले. विजेच्या खांबाखाली, उघड्यावरच बैठक भरली, त्यांनी तक्रारी ऐकल्या निर्णय काही दिला नाही.

 निर्णयासाठी दोन्ही बाजूंनी नंतर पंचायतीत जमावे असे ठरले.
 उत्तमराव दलितवस्तीतून पंचायतीकडे निघाले, पोचले.
 इकडे दलितवस्तीत कुणी तरी अंधाराचा फायदा घेऊन एका दलित तरुणाला मारहाण केली.
 दलितांनी पंचायतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकायचे ठरवले.
 पंचायतीत थांबलेल्या उत्तमरावांना व तेथे बैठकीसाठी जमलेल्या जयसिंगराव पाटलांच्या लोकांना बहिष्काराचा निर्णय सांगण्यासाठी उल्हास व आणखी एक दोन जण गेले असता, त्यांना तेथेच उत्तमरावांनी आग्रह करून बसवून घेतले व बैठकीत भाग घेण्यासाठी त्यांचे मन वळवले.

 बैठक दोन-तीन तास चालू होती. दलितांची मुख्य मागणी नुकसानभरपाईची होती. जयसिंगरावांच्या मंडळींनी अनेक हरकती घेतल्या; पण उत्तमरावांनी त्या सर्व मोडून काढल्या.

अमळथे । २०९