कामगार संख्या सुमारे दहा हजार. भारतीय मजदूर संघ, उजव्या कम्युनिस्टांची आयटक या दोन मजूर संघटनात मान्यतेबद्दल वाद होता. खुली निवडणूक झाली. कामगारांनी उत्साहाने मतदान केले. आयटकला बहुमत लाभले. इतर संघटनांचे कामकाज चालू असले तरी सध्या मान्यता फक्त आयटक युनियनलाच आहे. वाटाघाटी, करार-मदार फक्त आयटक युनियनशीच होऊ शकतात. राजस्थान वॉटर वर्क्समध्येही मान्यतेचा प्रश्न अशाच लोकशाही पद्धतीने सोडविला गेला. तेथे भा. म. संघ प्रणीत युनियनला मान्यता आहे. कामगार मंत्रालयानेच हा पायंडा पाडल्याने इतर ठिकाणीही त्याचे अनुकरण होण्याची शक्यता आहे. केदार शर्मा हे मजूरमंत्री पूर्वी समाजवादी पक्षाचे होते. मुख्यमंत्री भैरवसिंग शेखावत जनसंघ गटाचे आहेत. तरी पण महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे राज्यात आहे अशी तेढ, अविश्वास येथे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप फार कौशल्याने केले, असे म्हटले जाते. समाजवाद्याकडे कामगार खाते दिले, तर गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी एका हरिजनावर सोपविण्यात आली. कनिष्ठ जातींवर येथेही अन्याय-अत्याचार होतच असतात. त्यातून राजेरजवाड्यांचा, जहागिरदारांचा अद्यापही प्रभाव असलेले, हे सरंजामशाही युगातून पूर्णपणे बाहेर न पडलेले राज्य. तरीपण बेलछीसारखे एकही प्रकरण येथे वर्षभरात उद्भवलेले नाही. दोन कारणे : प्रकरणे उद्भवल्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. हेळसांड किंवा दाबादाबी करणाऱ्या वरिष्ठांना किंवा सामान्य ठाणेदारालाही बडतर्फ केल्याची उदाहरणे आहेत. गृहमंत्रालयच एका हरिजन व्यक्तीकडे देऊन प्रकरणाला जातीय रंग चढविण्याची संधीच विरोधकांना लाभू दिली गेली नाही. स्वतः मुख्यमंत्रीही एका अगदी सामान्य कुटुंबातून वर आलेले आहेत. गरिबीमुळे शिक्षण अर्धवटच झाले. पोलीसखात्यात कुठलीशी नोकरी होती. ती सोडून राजकारणात आले आणि कर्तबगारीच्या बळावरच आज सर्वोच्च ठिकाणी पोचले आहेत. मंत्रिमंडळातील एकोपा हेवा करण्यासारखा आहे आणि नुकतेच एका समारंभप्रसंगी त्यांनी काढलेले उदगार तर इतर कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री काढू शकणार नाही असे आहेत.भैरवसिंग म्हणाले : I feel gratified in saying that no charge of corruption was levelled against any of my colleagues or senior officers in any forum ...
भ्रष्टाचाराचा एकही आरोप, एकाही मंत्र्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यावर या वर्षभरात नसावा यावर विश्वास बसत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे खरी.
जयपूरहून निघणाऱ्या'दैनिक नवज्योती' या वृत्तपत्रात मात्र एखादी वार्ता अशीही प्रसिद्ध होत असते : ‘सादुलपूरनगरच्या जागरुक जनता पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री भैरवसिंग शेखावत, विद्युतमंत्री ललितकिशोर चतुर्वेदी, राजस्थान