पान:निर्माणपर्व.pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सौंदर्याची उपासना आणि स्वातंत्र्याची प्रेरणा ! नाही तरी या दोन्ही एकत्र क्वचितच नांदतात. का या दोन्हींची उगमस्थाने, विकासप्रक्रिया मूलत:च भिन्न आहेत ?


 जनता शासनाला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून येथे सध्या एक 'नव चेतना सप्ताह' चालू आहे. प्रदर्शन उभे आहे. पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत. कार्यकर्ते, मंत्री, सरकारी अधिकारी या वाढदिवस समारंभात मग्न आहेत. जयपुरात यानिमित्त एक परिसंवाद झाला आणि वक्त्यांनी जनता पक्षाच्या वर्षाच्या कामगिरीसंबंधी आपापली मते मांडली. महागाई कमी झाली नाही व कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, हे आक्षेप घेतले गेले. उलट राजस्थान साहित्य अॅकॅडमीचे अध्यक्ष श्री. विष्णू दत्त शर्मा यांनी लोकाभिमुखता आणि स्वच्छ कारभार याबद्दल जनता राजवटीला धन्यवादही दिले. बाकी लोकशाही वाचवली वगैरे नेहमीचे मुद्देही या परिसंवादात मांडले गेलेच. श्रीमती विद्या पाठक या समाज कल्याण खात्याच्या उपमंत्री या परिसंवादाला उपस्थित होत्या. त्यांंनी समाज कल्याण योजनांची अन्त्योदयाशी सांगड घालण्याचा जनता शासनाचा निर्धार असल्याचे याप्रसंगी सांगितले व या पहिल्या वर्षात या दृष्टीने काय काम झाले, याची आकडेवारी सादर केली. ती आकडेवारी पन्नास टक्के जरी खरी असली, तरी राजस्थानपुरती जनता पक्षाची एक वर्षाची कामगिरी डोळ्यात भरण्यासारखी आहे, असे म्हणायला हरकत नाही. आकडेवारी अशा आहे. पहिल्या वर्षात-
 ८१,०००   कुटुंबे अन्त्योदय लाभासाठी निवडली गेली.
    लाख महसूल प्रकरणे जागच्या जागी, खेड्यात जाऊन निकालात काढली.
  १४३१  प्राथमिक शाळा सुरू झाल्या.
  ५६८   उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या.
  १३   महाविद्यालये सुरू झाली.
  १५   महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाची नव्याने सोय करण्यात आली.
  २००   आयुर्वेदिक, युनानी दवाखाने सुरू झाले.
  २०३   दवाखाने मंजूर झाले.
  ४९६   आरोग्यचिकित्सा उपकेंद्रे मंजूर झाली.
  १२८   आरोग्य मदत केंद्रे ( मेडिकल एड पोस्टस् ) मंजूर झाली.

  ५०   गुरांचे दवाखाने मंजूर.

निर्माणपर्व । १९०