Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गिरिराजजी आचार्यजी या नावाने अधिक परिचित. मध्यम वयाचे गृहस्थ. भलतेच तडफदार. त्यांनी दोन-चार मंत्र्यांच्या मुलाखती ठरवूनही टाकल्या. मला यात फारसा रस नव्हता. सरकारी गाडी, मंत्र्यांच्या मुलाखती, अधिकऱ्यांच्या भेटी हा गराडा सुरुवातीला मला नको होता. यातून निसटायचे कसे ? आपल्याला जे पाहायचे आहे ते वेगळेच आहे.

 आठवड्यापूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये एक बातमी वाचली होती. त्यात जयप्रकाशजींनी राजस्थानच्या जनता सरकारने सुरू केलेली 'अन्त्योदय' योजना ही संपूर्ण क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यातील फार महत्त्वपूर्ण घटना आहे, असे म्हटले होते व नियोजनमंडळानेही या योजनेचा स्वीकार करावा, अशी शिफारस केली होती.

 वसंतराव भागवत, पन्नालाल सुराणा वगैरे महाराष्ट्रातील जनता पक्ष मंडळींशी बोलणे करून मी लगेच ही योजना पाहण्यासाठी, समजावून घेण्यासाठी जयपुरात दाखल झालो होतो.

 पण सर्किट हाउसमध्ये अडकलो.
 कुठे अन्त्योदय आणि कुठे सर्किट हाउस ?
 रात्र अस्वस्थतेत गेली.


 सकाळी मोरांच्या आवाजाने जाग आली. मोर दिसायला चांगला असला तरी ओरडणे मात्र भयानक. केकावली कसली ? केकाटणेच ते. आदल्या दिवशी टूरिस्ट हॉटेलच्या आवारात, रस्त्यावरही मोर दिसले होते. बागा,हिरवळी,कारंजी, मोर, जुन्या इमारती, मागील काळात घेऊन जाणाऱ्या होत्या. सवाई माधोपुर ते जयपूर या आदल्या दिवशीच्या रेल्वे प्रवासातही 'बिरबल बादशहाच्या गोष्टीच' कानावर येत होत्या. आपल्या डोळ्यांसमोर राजस्थान म्हटले की, राणा प्रताप, चितोड, हळदीघाट येतो. इथे या स्मृतींचा मागमूसही आढळत नाही. मागाहून कळले की, जयपूरवाले व उदेपूरवाले अशी एक तेढ येथे अस्तित्वात आहे.

 जयपूर शहराची स्थापना सवाई जयसिंगाने केली. मोगल दरबाराची तनमनधनपूर्वक सेवा चाकरी करणाऱ्या मानसिंगाचा हा औरंगजेबकालीन वंशज. विद्याकलांचा भोक्ता. सौंदर्याचा उपासक-जयपूर शहराची रचना आजही नगर शास्त्रकारांचा कौतुकाचा विषय आहे.

 दिल्ली येथून दोन-अडीचशे मैलांवर आहे. दिल्लीपतींच्या अनेक स्वाऱ्या येथून आल्या-गेल्या असतील; पण जयपूरचे सौंदर्य दोनशे वर्षे अबाधित राहिले.

मुक्काम जयपुर, राजस्थान । १८९