पान:निर्माणपर्व.pdf/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.मुक्काम जयपूर, राजस्थान


 जयपूर : गुरुवार दिनांक २१ जून. स्टेशनवर घेण्यासाठी कुणी तरी येईल अशी कल्पना होती. थोडा वेळ वाट पाहिली. कुणी दिसले नाही. रिक्षाने पक्षांच्या कचेरीत सामानासह दाखल झालो. सायकलरिक्षा..गुलाबी शहर... Pink city...

 कचेरीला कुलूप. एक विद्यार्थी शेजारच्या खोलीत राहत होता. कचेरी नुकतीच बदललेली आहे असे सांगितले. निरोप ठेवला आणि असलेल्या टूरिस्ट हॉटेलचा आश्रय घेतला.

 चहा अडीच रुपये.
 जेवण आठ रुपये. (शाकाहारी... साधे)
 पान वगैरे खाऊन चक्क ताणून दिली. प्रवासाचा शीण घालविण्यासाठी.
 फोनने जाग आणली. जनता पक्षाच्या कचेरीतून बोलावणे आले होते.
 झोप अर्धवट टाकून कोण जाणार ? दोन तासांनी येतो असे सांगून झोप पुरी केली.

 जनता पक्षाची कचेरी आता म्युझियम रोडवर अधिक प्रशस्त जागेत आहे. कचेरी आधुनिक व टापटिपीची वाटली. मधु लिमये, राम मनोहर लोहिया,जगजीवनराम, मोरारजी, दीनदयाळ उपाध्याय यांच्या तसबिरी एकत्र प्रथमच येथे दिसल्या, म्हणून बरे वाटले.

 मंत्री गिरिराजजींना, स्टेशनवर कुणी घ्यायला आले नाही व मी टूरिस्ट हॉटेलमध्ये उतरलो, हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यांनी दोन-चार फोन फिरवले. ठरल्याप्रमाणे स्टेशनवर एकजण गाडी घेऊन सकाळी १०।। वाजता गेल्याची खात्री करून घेतली; पण घ्यायला आलेल्या माणसाने मला ओळखले नाही व मी तरी त्याला कसा ओळखणार ? चुकामूक झाली होती.

 ताबडतोब माझे सामान वगैरे टूरिस्ट हॉटेलमधून मागविण्यात आले. संध्याकाळी सर्किट हाउसमध्ये सरकारी पाहुणा म्हणून दाखल झालो.

निर्माणपर्व । १८८