पान:निर्माणपर्व.pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुन्हा इंदिरा गांधी किंवा तत्सम दुसरा कुणी, ती हिरावून घेणार नाही याची शाश्वती काय ? लोकशाही स्वातंत्र्याची शाश्वती एकच असते. ती म्हणजे स्वायत्त व स्वयंपूर्ण लोकसंघटनांचे देशभर विखुरलेले, खेडोपाडी रुजलेले जाळे.* असे जाळे निर्माण करणे हाच इंदिरा गांधींच्या पुनरागमनाच्या धोक्याविरुद्ध योजावयाचा खरा एकमेव आणि टिकाऊ उपाय आहे. इंदिरा गांधींनी सर्वंकष शासनसत्तावाद आणला, म्हणून जनतेने त्यांना दूर केले. जनता पक्षातही अशा सर्वंकष शासनसत्तावादाचे काही पुरस्कर्ते नसतीलच असे नाही. सर्वंकष सत्तावादात रा. स्व. संघासारख्या स्वतंत्र व स्वायत्त संघटना बसत नव्हत्या, म्हणून इंदिरा गांधींना त्या नको होत्या. नव्या जनता राजवटीतही अशा संघटना नकोशा झाल्या, त्यांचे महत्त्व नाकारण्यात आले, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व डोळ्यात खुपू लागले,तर लोकशाहीला असलेला धोका संपला असे म्हणता येणार नाही.


  • " समाजसंघटकाला रामदासांनी स्वतंत्र ठेवले ही वस्तुस्थिती त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करते. कोणत्याही सत्तेच्या अधिपत्याखाली नसलेला स्वतंत्र कार्यकर्ता हाच सांस्कृतिक व सामाजिक कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतो हे सत्य रामदासांनी हेरले होते. महंतांना भिक्षेचा उपदेश करून रामदासांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविले आणि 'कार्यकर्ते होऊ नये। राजद्वारी' असा आदेश देऊन राजसत्तेच्या क्षेत्रापासून अलिप्त ठेवले. समर्थाची महंतसंघटना ही एक सांस्कृतिक संघटना होती. त्या संघटनेला स्वतंत्र व स्वयंपूर्ण बनविण्यात समर्थानी अपूर्व योजकता प्रकट केली. समाजाच्या विकासात अशा स्वतंत्र, सांस्कृतिक संघटनांचे कार्य फार मोठे व महत्त्वाचे असते असा निर्वाळा मॅक आयव्हर व पेज या समाजशास्त्रज्ञांंनी दिलेला आहे."Cultural activity attains its ends more fully when it is free to organize itself in associations that not dependent on the organization of the political - economic complex ... Thus the liberation of cultural association from the control of the political-economic organzation is a significant aspect of social evolution' ( Society : An introductory analysis, P.486 ). सांस्कृतिक संघटनेमध्ये सांस्कृतिक कार्य व सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी एकवटलेल्या असतात हे सत्यही वरील समाजशास्त्रज्ञांंनी उघड केले आहे. रामदासांच्या महंतसंघटनेचे उद्दिष्टही देवकारण, धर्मकारणापुरते मर्यादित नसून त्यांच्यासह समाजसंघटना करण्याएवढे विशाल होते."
- सामर्थ्ययोगी रामदास
 
लेखक : प्रभाकर पुजारी
 
पृष्ठ : ५७ ( समर्थांचे समाजचिंतन )
 
निर्माणपर्व । १८२