पान:निर्माणपर्व.pdf/181

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सारख्या मागासलेल्या, दरिद्री देशात, गरिबांच्या बाजूने लढगा-यालाच तो मुख्यतः लाभणार हेही उघड आहे. कारण आपले शतकानुशतकांचे दारिद्रय हटावे ही इथल्या तळागाळातल्या जनतेची अगदी मनोमनीची इच्छा आहे. ही एक नैसर्गिक भूक आहे आणि ही भूक पूर्ण करणा-या एखाद्या देखाव्यावरसुद्धा ही जनता लुब्ध व्हायला तयार आहे-असते. इंदिरा गांधींची ‘गरिबी हटाव' ही घोषणा किंवा नंतरचा वीस कलमी कार्यक्रम, यावर, त्यातील बराचसा भाग देखाव्याचा होता हे खरे असले तरी, जनता लुब्ध झाली, इंदिरा गांधी 'नवी रोशनी' ठरल्या हे नाकारून कसे चालेल ?
 इंदिरा गांधींच्या या अनन्यस्थानामुळेच त्यांची काँग्रेस पक्षालाही अजून आवश्यकता भासत आहे. त्या सोडल्या तर एकही काँग्रेसनेता असा नाही की ज्याला आपल्या प्रांताबाहेर अखिल भारतीय अशी काही मान्यता आहे. आज पेचप्रसंग असा आहे की, त्यांची मदत न घेतली, तर काँग्रेस पुन्हा उभी राहू शकत नाही आणि त्यांची मदत घेतली, तर त्या इतरांना कुणाला उभेसुद्धा राहू देणार नाहीत. कुठलाही निर्णय घेतला जावो, काँग्रेसचे-निदान तिच्या अखिल भारतीय लोकशाही स्वरूपाचे मरण आज असे अटळ ठरत आहे. तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून चालेना' असा हा अस्तित्वाचा पेचप्रसंग काँग्रेससमोर इंदिरा गांधींच्या करिष्म्याने उभा केलेला आहे आणि आयुध म्हणून याचा पुरेपूर उपयोग करून न घेतील तर त्या इंदिरा गांधी कसल्या?
 याच्या जोडीला प्रांतोप्रांती असंतुष्ट असलेले काँग्रेसगट इंदिरा गांधींना मिळतील हेही गृहीत धरून चालायला हवे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात यशवंतराव मोहिते आजही आपली इंदिरानिष्ठा व्यक्त करायला कचरत नाही आहेत. वेळ आलीच तर ते आणि त्यांचा गट कुठे असेल, याचा तर्क यावरून सहज बांधता येतो. इतरही प्रांतात अशीच स्थिती असणार, नसल्यास ती निर्माण करता येऊ शकते. मदतीला ' १ सफदरजंग' मधून २२ मार्चला एका चकचकीत टोयोटोमधून सुरक्षित जागी हलविले गेलेले 'ते' डबे असतीलच !

 आणखी एक भाग, जो आपल्या सांस्कृतिक मनोरचनेशी निगडित आहे, तोही विचारात घ्यायला हवा. संकटात सापडलेल्या व्यक्तीविषयी आपण एकदम हळवे होतो. ती व्यक्ती दोषी आहे हे माहीत असूनही जनसामान्याची सहानुभूती अशा संकटात सापडलेल्या, चहुबाजूंनी कोंडीत पकडल्या गेलेल्या व्यक्तीला लाभते व नकळत क्षमाभावनाही जागृत होते. जनमानस फार उदार आणि विसराळूही असते हा नेहमीचा अनुभव आहे. त्याचे संतापणे, क्षुब्ध होणे, प्रेमात पडणे, सर्व क्षणिक असते. इंदिरा गांधींच्या बाबतीत क्षुब्ध होण्याचा, संतापण्याचा क्षण उलटला आहे आणि जसजशी त्यांच्याभोवतीची कोंडी

निर्माणपर्व । १८०