पान:निर्माणपर्व.pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनता पक्षाचे अनेक नेते इंदिराजींना ‘नयी रोशनी' समजून सुरुवातीला त्यांच्या कर्तृत्वाने दिपलेले होते, हे नाकारून चालेल काय ? बांगला देश युद्धातील विजयामुळे संघ-जनसंघ वर्तुळातही त्यांना एकदम मान्यता लाभली. जनसामान्यांवरची त्यांची मोहिनी तर आणीबाणी पुकारल्यावरही कायम होती. सगळे संस्थाचालक, कारखानदार, शिस्तप्रिय नागरिक, नोकरशाहीतील मंडळी, मोर्चे निदर्शने संपली, मन मानेल तसा कारभार करायला मोकळीक मिळाली, म्हणून मनातून इंदिरा गांधींवर खूषच होती. कुणालाच आणीबाणीचे सत्यस्वरूप, ती पुकारण्यामागील इंदिराजींचे अंतस्थ हेतू, यांची नीटशी कल्पना येऊ शकलेली नव्हती. त्यामुळे कुणी त्यांच्या गौरवपर पूर्वी लिहिले असले आणि नंतरच्या अनुभवावरून आपले मत त्याने बदलले असले तर एकदम अशा व्यक्तींवर धंदेवाईक दृष्टीचा आरोप सरसकटरीत्या करणे काहीसे अन्यायाचे ठरते. 'माणूस जनविराट अंक (२)' मधील डॉ. श्रीराम लागू यांची मुलाखत या दृष्टीने फार प्रातिनिधिक आहे. प्रामाणिक मतपरिवर्तनाची त्यात स्पष्ट कबुली आहे. 'अँटिगनी'सारखे प्रतिकाराची प्रेरणा जागविणारे नाटक ऐन आणीबाणी काळात ( माणूस दिवाळी अंक १९७५ ) सादर करूनदेखील डॉ. लागूंची मनःस्थिती या काळात द्विधाच होती. देशाला अराजकाचा धोका होता आणि आणीबाणी पुकारून इंदिरा गांधींनी हा धोका टाळला, असे त्यांना संजय गांधींच्या उदयापर्यंत मन:पूर्वकतेने वाटत होते. नंतर मात्र त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. असे फार लोकांच्या, चांगले चांगले विचारवंत म्हणविणा-यांच्या बाबतीत झालेले आपल्याला दिसून येईल. पुण्यात तर एक साहित्यिक विचारवंत असेही होते, की आणीबाणीमागील ‘मास्टरमाइंड' संजय होता हे एका मोठ्या परदेशी वृत्तपत्रात छापून आल्यावर, ' संजयही कर्तबगारच दिसतो' असे म्हणायलाही त्यांनी कमी केले नव्हते.
 प्रश्न असा आहे की, बाई पुन्हा एकदा सगळ्यांना चकवणार काय ? पुढचा प्रश्न असाही आहे : या चकवाचकवीच्या खेळात सगळ्यांनी भाग घेतलाच पाहिजे का ?
 


 उमा वासुदेव यांच्या पुस्तकाचा शेवट असा आहे-

 Indira Gandhi did not resign for two days. On 22 March a sleek Toyota car was seen being packed with tins, presumably containing money. Part of the election money had been distributed to the contestants for the election from 2 Kushak Road, where a solid fence had assured privacy

निर्माणपर्व । १७८