आणखी २।३ पुस्तकांची नावे सांगितली गेली. पाहता पाहता पुस्तकांची संख्या डझनावर गेली. गेल्या तीन महिन्यात केवळ इंग्रजी भाषेत आणीबाणी या विषयावर दहा-पंधरा तरी पुस्तके बाहेर पडली किंवा 'पाडण्यात आली' असा हिशोब निघाला. देशी भाषांतून निघालेल्या पुस्तकांचा हिशोब ठेवणे तर अशक्यच होते.
समोर असलेल्या सहाही पुस्तकांची अशी थोडी चाळवाचाळव करून झाल्यावर वक्त्यांनी सांगितले-बहुतेक पुस्तकातील फार थोडाच भाग नवीन आहे. जो नवीन आहे त्यातही चटकदार मालमसाला पुरविण्याची दृष्टीच मुख्य आहे. आणीबाणीमुळे इथे जो लोकशाही मूल्यांचा विध्वंस झाला, स्वातंत्र्यभावना दडपली-चिरडली गेली, त्याबद्दलचा 'विषाद' या सर्व पुस्तकांत कुठेही जाणवत नाही. शिवाय चटकदार मालमसाला म्हणून पुरविली गेलेली माहितीही कितपत खरी, याची शंकाच आहे. कारण संबंधित बहुतेक व्यक्ती हयात आहेत. या व्यक्तींची सत्तेच्या राजकारणात पुन्हा घुसण्याची धडपड जोरात सुरू आहे. नुकत्याच इंदिरा गांधी बेलछीला जाऊन आल्या. त्यांच्या कारकीर्दीत हरिजनांवर अत्याचार काय कमी झाले ? पण एकदाही कुठे त्या अशा गेलेल्या नव्हत्या तेव्हा अशा व्यक्तींबद्दल लेखकांना मिळालेली माहिती अनेक स्वार्थी हितसंबंधांच्या परिपूर्तीसाठीही पुरविली गेली असण्याची शक्यता आहे. तेव्हा चांगल्या वस्तुनिष्ठ भूमिकेतून लिहिल्या गेलेल्या पुस्तकांसाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल. त्यातल्या त्यात विकत घेऊन वाचायचे असेलच तर 'An eye to India. The unmasking of a Tyranny' हे डेव्हिड सेलबर्न यांचे पुस्तक निवडा. ते निदान अभ्यासपूर्वक तरी लिहिले गेलेले आहे. लेखक परदेशी असूनही त्याने माहिती, संदर्भ जमविण्यासाठी खूपच कष्ट घेतलेले दिसतात. आपल्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकात असा अभ्यास दिसत नाही..
आणखी एक गंमत पाहा. या सहा पुस्तकांपैकी चार पुस्तकांच्या लेखकांनी तरी त्या वेळी आणीबाणीचे समर्थनच केलेले होते. आता काळ बदलला तशी याची मतेही फिरली. लेखण्यांची टोकेही वळली. हा प्रकार तर सर्वात चीड आणणारा आहे. यांच्यात आणि ब्लिट्झ-करंटवाल्यांसारख्या पत्रकारांत फरक तो काय ? खास नमुना पाहायचा असेल तर उमा वासुदेव यांचे Two faces of Indira Gandhi' हे पुस्तक पाहावे. याच बाईंनी इंदिरा गांधी सत्तेवर असताना ‘Indira Gandhi-Revolution in restraint' या नावाचे इंदिराजींची भयंकर स्तुती करणारे पुस्तक लिहून, त्या वेळीही चांगला बाजार कमावलाच होता...
उमा वासुदेव यांनी चांगला बाजार कमावला असो नसो; पण इंदिरा गांधींच्या बाबतीत भलेभलेही चकले आणि चुकले आहेत हेही विसरून चालणार नाही.