पान:निर्माणपर्व.pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

‘ताबडतोब पुस्तक विकत घेऊन जमेल त्या स्वरूपात माणूसमधून छापून टाका. पुस्तकावर बंदी येण्याची शक्यता आहे. अगदी आपल्याकडील सध्याच्या परिस्थितीवरच जणू काही लिहिले आहे. दळवी म्हणाले.
 आदल्याच दिवशी महाराष्ट्र टाईम्सचा वार्ताहर अशोक जैन भेटला होता. त्याने एक भयंकर' पुस्तक हाती आले आहे. आणि 'माणूस' साठी आपण ते अनुवादित करीत आहोत, असे उडत उडत सांगितले होते.

 पुस्तक विकत घेतले. जैन आणि दळवी यांची निवड एकच निघाली. आणखीही ७।८ जणांनी तरी हे पुस्तक आम्ही अनुवादित करतो' असे कळवले, इतकी या पुस्तकाची तेव्हा हवा होती. मुख्य प्रश्न अर्थात ‘पुस्तकावरील संभाव्य बंदी' किंवा 'सेन्सॉरची कात्री' हा नसून जैनकडून हा अनुवाद वेळेवर कसा मिळवायचा हा आहे. हे लवकरच मुंबईकर मित्रांनी ध्यानात आणून दिले आणि माणूसवरील लोभाखातर त्यांनीच ‘जैन पाठलाग मंडळ' स्थापन करून कामाची वाटणी करून घेतली. पुष्पा भावे, अनंतराव भावे, रामदास भटकळ, अरुण साधू दिनकर गांगल वगैरे मंडळ सदस्यांनाही जैन पुरून उरतो आहे हे लक्षात येताच दि. वि. गोखले यांचीही मदत घेणे शेवटी भाग पडले. अखेरीस जैन नामोहरम झाला. आपली पुरती कोंडीच झाली आहे, हे ध्यानात आल्यावर मात्र गडी भलताच तडफदार आणि दमदार निघाला. अक्षरशः चार दिवसात त्याने कामाचा फडशा पाडला. मुळातले काही कमी न होऊ देता, कमीत कमी जागेत, सरस अनुवाद वेळेवर पाठवून, त्याने गेल्या वर्षाची (७६) दिवाळी गाजवून सोडली. दीड-दोनशे दिवाळी अंक निघाले. फक्त दोन दिवाळी अंकात राजकीय परिस्थितीवर प्रत्यक्षअप्रत्यक्ष प्रकाश टाकणारी काही चर्चा, काही लेख, साहित्य आले होते. एक निळू दामले याने संपादित केलेला 'मराठवाडा' दैनिकाचा दिवाळी अंक आणि ‘माणूस' बाकी अंक काव्यशास्त्रविनोदात-ललित साहित्यात आकंठ बुडालेले. देश प्रचंड काळोखात आहे, लाखावर निरपराधी लोक गजाआड बंदिस्त आहेत, घटनेची मोडतोड सुरू आहे याची गंधवर्ता जणू या दिवाळी अंक काढणा-यांना नसावी! आणीबाणी सगळेचजण विसरले होते. गेल्या वर्षीचा लेखकांचा, कुठल्याही दिवाळी अंकात निषेध म्हणून न लिहिण्याचा क्षीण असा संकल्पही बारगळला होता. ही पाश्र्वभूमी होती ‘आर डॉक्युमेंट' च्या प्रसिद्धीची. त्यामुळे अंक निघाल्यालरोबर संपादक-सहसंपादकांना अटक झाल्याची अफवा जोरात फैलावली, यात नवल नव्हते. एक-दोन ठिकाणी पोलिसांनी अंक जप्तही करून नेला होता. कोणीतरी खोडसाळपणा केल्यामुळे अंक पोस्टातही थोडा रखडला. अफवा पसरायला एवढी कारणे पुरेशी होती. सेन्सॉरच्या कात्रीतून अशी 'भयंकर' खळबळ उडवून देणारा मजकूर सुटला कसा, हे मात्र ‘गुपित'च राहिलेले बरे. सगळचा चोरवाटा

निर्माणपर्व । १७४