पान:निर्माणपर्व.pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दडपशाही आणि भीतीच्या वातावरणातून टिळकांना वाट काढायची होती. निदान आरत्या म्हणायला तरी लोक एकत्र जमू देत. त्यातून हवा तो विचार, हवी ती धिटाई हळूहळू प्रगट होईल, असा गणेशोत्सवामागील टिळकांचा हेतू होता. तेलातुपाचे वाटप करताकरता देखील असा काही अंतरीचा हेतू ठेवून कार्य करणे ग्राहक चळवळीला अशक्य नव्हते.
 अनिल बर्वे यांची ‘बँक्यू मि. ग्लाड' ही कादंबरी 'माणूस' मधून याच सुमारास आली. वाचक अक्षरशः थरारून गेले. कादंबरीचा नायक नक्षलवादी आहे की, नंतर झालेल्या कादंबरीच्या नाट्यानुवादाप्रमाणे क्रांतिसिंह आहे, हा सवाल नव्हता. एका जुलमी सत्तेशी झुंज घेणारा हा एक बेडर आणि ध्येयवादी तरुण आहे, याने वाचक विलक्षण प्रभावित झाले होते. वीरभूषण पटनाईकाच्या हौतात्म्याची ही एक ज्वलंत दाहक कहाणी होती. काळ्याकुट्ट अंधारात वीज चमकावी, क्षणकाल आसमंत उजळून निघावे तशी आणीबाणीत ही कथा चमकली-गाजली. खाडिलकरांच्या 'कीचकवधा' सारखा परिणाम तिने साधला.
 पाठोपाठ क-हाडचे साहित्य संमेलन आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे छापील भाषण छापायचे नाही, अशा सेन्सॉरच्या आज्ञा भाषण झाल्यावर ताडतोब सुटल्या. त्या फोनवरून दैनिकांना दिल्या गेल्या. त्यामुळे दुस-या दिवशीच्या एकाही वृत्तपत्रात तर्कतीर्थाचे भाषण आले नाही. तुरळक ठिकाणी आले ते महत्त्वाचा शेवटचा लेखनस्वातंत्र्याचा उल्लेख गाळून. माणूस साप्ताहिक असल्याने अशी फोनवरून सेन्सॉरची आज्ञा काही त्यावर बजावली गेली नाही. या फटीतून सुटका होऊ शकली होती. सगळे भाषणच 'माणूस' ने छापून टाकले. साहित्य संमेलनावर व विशेषतः दुर्गाबाईंनी केलेल्या पराक्रमावर तर एक सोडून दोन लेख 'माणूस' ने दिले. अगदी संमेलनाच्या सुरुवातीला दिल्या गेलेल्या घोषणांच्या उल्लेखासहित.

 'तर जपानमधल्या प्रस्थापिताच्या विरुद्ध लढ्याची ही आणखी एक चित्रपट कथा. तिचं नाव तितकंच यथार्थ-'रिबेलियन.' एका पिसाट धर्मसत्तेविरुद्ध किंवा राजसत्तेविरुद्ध काही नगण्य पण सच्चा माणसांनी दिलेली एक लढत'...ही सुरूवात आहे एका चित्रपट समीक्षणाची. समीक्षक आहेत अशोक प्रभाकर डांगे असे कितीतरी परदेशी चित्रपट हुडकून हुडकून त्यांच्या कथा डांगे यांनी या काळात आवर्जून सादर केल्या.

 रिबेलियन' चा प्रकाशनकाळ आहे. २७ डिसेंबर १९७५. आणीबाणीला फक्त सहा महिने झाले होते.

चित्त हवे भयशून्य । १६७