काढणेच बरे नव्हे का ? कारण त्यातील मुख्य आरोपी श्री. नगरवाला हॉस्पिटलमध्य ‘हृदयविकाराने’ मृत्यू पावला. या प्रकरणाची चौकशी करणारे कश्यप, ग्रेंड ट्रंक रोडवरील अपघातात ठार झाले. पोलीस तपासात पुरेसा पुरावा पुढे न आल्यामुळे स्टेट बँकेचे चीफ कॅशियर श्री. मल्होत्रा यांच्यावरील खटला काढून टाकला गेला आणि या प्रकरणावर पडदा पडला. त्यामुळे आता अजूनही राजमुकुटाच्या चोरीसारखीच ही राजपेढीतील (स्टेट बँक) ६० लाखांची चोरी ‘करण्यात’ आली असे तर्कवितर्क करण्यात काय स्वारस्य? श्री. मल्होत्रांना बँकेतून काढून टाकण्यात आले. ही शिक्षा त्यांना पुरेशी आहे. नव्हे का ?'
२६ जूनला आणीबाणी जाहीर झाली. बरोबर एक महिन्यानंतरच्या २६ जुलैच्या माणूस अंकात कथेचा हा शेवट सेन्सॉरच्या परवानगीने छापून येऊ कसा शकतो? आयुक्तांच्या कचेरीत संपादकांना पुन्हा बोलावले गेले. का बोलावले ते फोनवरून अगोदर सांगितलेले असल्याने संपादकही सेन्सॉरची सही शिक्क्याची प्रत घेऊन हजर झाले. ताकीद देण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी फक्त तोंडी. संपादकांनी हळूच सेन्सॉरची मान्यता प्रत दाखवली. अधिका-यांचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला !
‘सेन्सॉरवाल्यांनाच आता टप्पू घातला पाहिजे' असे म्हणत अधिकारी संपादकांबरोबरच खोलीबाहेर पडले.
पुढचे १।२ अंक पड खाल्ली. वाईचे डॉ. शरद अभ्यंकर यांनी लिहिलेल्या सूचक नीतीकथाही सेन्सॉर संमत करीना. १५ ऑगस्ट अंक बंदच ठेवला आणि नंतरच्या अंकात खूप काटछाट होऊन आलेला आबा करमरकरांचा विधायक कार्यावरील लेख, काटलेला भाग पांढराच ठेवून छापून टाकला. अंगावर कोड दिसावा तसा लेख दिसत होता. पांढ-या मोकळ्या जागेतील मजकूर सेन्सॉर झालेला आहे हे न सांगताच समजत होते. सेन्सॉरला हा अप्रत्यक्ष निषेध कसा मानवणार? त्यांनी हरकत घेतली. हरकत फार जोरदार वाटली नाही म्हणून ही कोड फुटलेला पाने 'माणूस' मधून जरूर वाटली तेव्हा पुढे येतच राहिली.
चौकटी वेगवेगळया वेळी, सुट्या सुट्या, सेन्सॉरकडून मंजूर करून घ्यायच्या. त्यांची मांडणी एकत्रित करून हवा तो अर्थ वाचकांपर्यंत पोचवायचा-हीही एक चोरवाट या कठीण काळात 'माणूस' ला उपयुक्त ठरली.
ग्राहक चळवळीचा वर्धापन दिन आला. सप्टेंबर महिना. गणपती उत्सवही सुरू होता. चित्र टाकून टिळकांचा काळ आणि सद्य:स्थिती यातील साम्य सूचित करता येत होते. टिळकांच्या काळात गणेशोत्सवाने जी कामगिरी बजावली ती नाटक संघांनी आता बजवावी, इतपत उघडपणे लिहिलेले चालू शकले. भयंकर