पान:निर्माणपर्व.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गिरण्याच खेडेगावात हलवाव्यात–थोडीफार सक्ती, बरेच उत्तेजन देऊन हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर घडवून आणावे, हा एक उपाय आहे. पण गिरण्यांतील कामगार, कामगारांच्या संघटना याला तयार होतील का ? मग मालकांची संमती तर लांबच राहिली. कोण स्वतःहून आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार ? कामगार संघटनांचे हितसंबंधही असे केंद्रीकरणात गुंतलेले आहेत. त्या आपले शहरातले बस्तान सोडून खेडोपाडी विखुरल्या जायला तयार होणार नाहीत.

 म्हणजे खेड्यातल्या मालाला-ग्रामीण उद्योगधंद्यातून तयार होणाया वस्तूना शहरात गिऱ्हाईक नाही आणि शहरातील माणसे किंवा उद्योगधंदे खेड्यात जायला तयार नाहीत. मग विकेंद्रीकरण होणार कसे ?

 दोन आघाड्यांवर एकसमयावच्छेदेकरून उठाव केला तरच ही कोंडी फुटू शकणार आहे. ग्रामीण भागात अल्प भूधारकांच्या, शेतमजुरांच्या संघटना एकीकडे उभारल्या पाहिजेत, दुसरीकडून ग्रामीण पुनर्रचनेचा एक व्यापक कार्यक्रम ठराविक काळात पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. पहिले काम शासनाबाहेर असणाऱ्या कार्यकर्त्यांचे, संघटनांचे आहे. दुसरे काम सत्तेवर येणाऱ्या लोकांचे आहे. ग्रामीण सुधारणांचे फुटकळ प्रयत्न आजवर झाले. इंदिरा गांधींचा वीस कलमी कार्यक्रमही फुटकळ दृष्टिकोनाचा एक आविष्कार आहे. अशा तुटक तुटक प्रयत्नांनी काहीही साध्य होणार नाही. हे काम एक युद्ध अापल्याला जिंकावयाचे आहे या जिद्दीने पार पाडले जायला हवे. खेडेगावात रस्ते नाहीत, स्वच्छता नाही, शिक्षणाची-औषधोपचाराची सोय नाही, प्रकाश नाही, करमणुकीची साधने नाहीत. अशा स्थितीत तिथे लोक राहणार कसे ? त्यांनी तेथे राहावे हे सांगायचा शहरी पुढाऱ्यांना–कार्यकर्त्यांना तरी अधिकार काय आहे ? यासाठी खेडी सुधारण्याचा जुजबी कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवून नाही. ती अद्ययावत् करण्याचाच दृष्टिकोन बाळगला पाहिजे. खेडी आधुनिक-अद्ययावत होणार असतील, तरच शहरात येणारा लोंढा थांबेल, शहरातीलही काही लोकसंख्या खेड्याकडे आकृष्ट होईल. यासाठी नवीन खेडी

योजनापूर्वक वसवली गेली पाहिजेत. जुन्या खेड्यांचे लहान लहान गट करून छोटी नगरे त्यातून साकार करायला हवीत. नवी खेडी वसवताना किंवा जुन्याचे नूतनीकरण करतानाही स्वयंपूर्णतेचा दृष्टिकोन काही काळ तरी आवश्यक आहे. प्राथमिक गरजांसाठी होणारे स्थलांतर टाळले गेले पाहिजे. वाहतुकीच्या साधनांवरचा वायफळ खर्च थांबवला पाहिजे. स्वयंपूर्णता म्हटल्यावर आपले आधुनिक अर्थशास्त्री 'मध्ययुगीन' ' मध्ययुगीन' म्हणून ओरडा करतील; पण तिकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. स्वयंपूर्णता म्हणजे तुटकपणा नव्हे.

जनविराट । १५३