पान:निर्माणपर्व.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अव्वल तात्त्विक क्षेत्रातील त्यांचा संचार मात्र अजून मान्यता पावलेला नाही. त्याची अधिक चिकित्सा व्हायला हवी. या चिकित्सेतून काही भरीव निष्पत्ती होवो न होवो, रॉय यांची या क्षेत्रातील कामगिरी, त्यांचे मोठेपण कुणीही अमान्य करू शकणार नाही. बुद्धिमंतांचे कर्तव्य त्यांनी निष्ठेने, निकराने पार पाडले. अविकृत ज्ञानसाधनेचा एक उच्च आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला, जो आदर्श पिढ्यान् पिढ्या जपला जाईल, अनेकांना स्फूर्ती देत राहील. प्राचीन भारतीय परंपरेवर रॉय यांनी कितीही आघात केलेले असोत. पण त्यांच्या बाबतीत तरी ही परंपरा शेवटी निर्णायक ठरली आहे. एक ऋषी, एक दार्शनिक म्हणून त्यांना आपले जीवन जगावेसे वाटावे, तेही हिमालयाच्या गूढ सान्निध्यात, याचा दुसरा कोणता अर्थ लावायचा ?

 ही भूमी शेवटी ऋषीमुनींची भूमी आहे.

 रॉयही या परंपरेत समाविष्ट झाले.

 एक ऋषी ठरले. रॉय यांचा मानवतावाद केवळ स्वप्नाळू होता असे नाही. सत्तेच्या विकेन्द्रीकरणाबाबतच्या रॉय यांच्या आग्रहाला अगदी निकडीचा संदर्भ आहे. जगात सर्वत्र आज आर्थिक-राजकीय सत्तेचे केन्द्रीकरण होत आहे. मोठमोठी औद्यागिक साम्राज्ये आपल्या आर्थिक जीवनाचे आज नियंत्रण करीत आहेत. तंत्रज्ञानाची प्रगतीही या दिशेने झेपावते आहे. यामुळे राजकीय केन्द्रीकरणही अटळ ठरत आहे. अशा परिस्थितीत लोकशाही जीवन पद्धतीचे भवितव्य काय असा प्रश्न सर्वच ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. भारतात तर तो विशेषच आहे. कारण येथील लोकमानसही लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या स्वातंत्र्याला पुरेसे महत्त्व देणारे नाही. अशा स्थितीत लोकशाही जीवनपद्धती टिकवायची, विकसित करायची, तर विकेंद्रीकरणाचा आग्रह अनिवार्य ठरतो आणि या संदर्भात रॉय-गांधी-विनोबा यांच्या दर्शनातील समान दुवे हुडकून, त्यात काही नवीन भर घालून, एखादा सर्वमान्य पर्याय पुढे येण्याची निकड विशेषच जाणवते. आणखी एखादा राजकीय पक्ष काढून ही लोकहाची कोंडी फुटेल असा संभव मुळीच नाही. आता नवीन दिशेने अगदी अगदी श्रीगणेशापासून सुरुवात करायची तयारी हवी. खेडोपाडी, लहानलहान स्वरूपात, रॉय यांनी सुचविल्याप्रमाणे लोकसमित्या काढून, लोकशाही जीवन पद्धतीचा

साक्षात्कार तळामुळात घडवायची जिद्द बाळगणारे लोकसेवकच नवा मार्ग दाखवू शकतील. जुन्या सर्व वाटा आता बंद पडल्या आहेत. ते दोर आता कापले गेले आहेत. जे. पी. चे नवनिर्माण आंदोलन बिहारमध्ये असे काही मूलभूत काम करू पाहत होते.

तळ नाही तोवर बळ नाही । १३७