पान:निर्माणपर्व.pdf/137

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आपण याबद्दलही त्याचे ऋणी राहिले पाहिजे.
 कारण मार्क्स आणि गांधी तरी सारखे कुठून येणार ?
 जिथून बळ मिळेल तिथून ते घ्यावे. पण स्वप्नांशिवाय जगण्यात काही अर्थ नसतो.

 आणि स्वातंत्र्याशिवाय, मुक्तीशिवाय उदात्त असे कोणते स्वप्न मानव जातीला श्रेयस्कर आहे ?
 बळ नाही, तोवर रॉयप्रमाणे आपण काही काळ निदान हे स्वप्न तरी पाहत राहू या. जरी अनेक उच्चपदे रॉय यांनी राजकारणात–विशेषतः कम्युनिस्ट चळवळीत-भूषविली असली तरी मुख्यतः त्यांनी वैचारिक नेतृत्व केले असेच म्हणावे लागेल. निवडक बुद्धिमंतांना रॉय आकर्षित करू शकले आणि प्रारंभिक स्फूर्तिस्थान हे त्यांचे चळवळीतील स्थान राहिले. मग चळवळ मेक्सिकोतील असो, नाही तर भारतातील असो. रॉय हे अग्रदूत म्हणून सर्व ठिकाणी वावरलेले दिसतात. जनसामान्यांविषयी त्यांना प्रेम असले, शेतकरी कामगारांच्या क्रांतीची स्वप्ने जरी ते पाहात असले तरी जनतेशी प्रत्यक्ष असा संबंध त्यांचा कुठेही आलेला दिसत नाही. त्यामुळे पुढारीपण त्यांच्याकडे न येता धोरणात्मक दिग्दर्शन ही त्यांची ठाम भूमिका ठरत गेली आणि ती मात्र त्यांनी अव्वल दर्जाने, निकराने आणि व्यवस्थितपणे पार पाडली. बुद्धिमंतांचे ( Intellectuals) प्रत्यक्ष राजकारणातील स्थान काय राहते याचा अभ्यास जर कुणाला करायचा असेल तर रॉय यांचे जीवन आणि कार्य अशा अभ्यासकाला खूपच उद्बोधक ठरेल. मूल्यसंस्थापना, मूल्यांचा आग्रह, जुन्यांची चिकित्सा, नव्याचा शोध हे बुद्धिमंतांचे समाजातील मुख्य कार्य असते-असायला हवे. हे कार्य केवळ अभ्यासिकेत-प्रयोगशाळेत बसून कुणी करील; कुणाला अगदी साहित्यकलादिकांच्या उंच मनोऱ्यातूनही हे कार्य साधता येईल. ज्यांच्या कृतीप्रेरणा बलवान असतात अशा रॉयसारख्या व्यक्ती राजकारणाच्या मैदानावर राहून हे कार्य करू पहात असतील. पण मैदानात वावरतात म्हणून अशा व्यक्ती राजकारणी ठरत नाहीत किंवा नेतृत्वही त्यांच्याकडे चालत येत नाही. जनसामान्यांना भुरळ घालणारे, त्यांच्या भावनांना स्पर्श करणारे काहीतरी नेतृत्व गुणात अभिप्रेत असते. रॉय यांचे आवाहन मुख्यतः बुद्धीला होते. त्यामुळे वैचारिक मार्गदर्शनाशिवाय अन्य कुठलेही काम त्यांना जमू शकले नाही.वैचारिक क्षेत्रातही त्यांची आशियाई देशातील क्रांतीबद्दलची धारणा काळाने बऱ्याच प्रमाणात यथार्थ ठरवली.

निर्माणपर्व । १३६