परिस्थितीचा विचार अपूर्ण आणि एकांगी असला, तरी तोही नेहमी करावा लागतोच आणि असा विचार करायचे म्हटले तर आज काय घडताना दिसते आहे ?
प्रादेशिकदृष्ट्या सत्ता गावातून शहरांकडे केव्हाच सरकलेली आहे. आता दहा-पाच शहरांऐवजी हळूहळू ती दिल्ली या एकाच राजधानीत केंद्रित होण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे.
विनोबांच्या ग्रामस्वराज्यातले 'ग्राम' पूर्वीच गेले होते. आता 'स्व'चाही लोप होत आहे. फक्त 'राज्य' राहाणार आहे आणि तेही एका व्यक्तीचे कदाचित ते महाराज्यही होईल; पण खासच या महाराज्याचा तोंडावळा विनोबांना पाहवणार नाही. तो सावरकरनिष्ठांना, कट्टर राष्ट्रवाद्यांना काही प्रमाणात आवडणारा असेलही; पण यात विनोबांना, त्यांच्या सर्वोदयाला कुठेही स्थान उरणार नाही, इकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ?
वर्गदृष्ट्या किंवा वर्णदृष्ट्या पाहिले तर विनोबा ज्या दिशेने आयुष्यभर चालले त्याविरुद्ध दिशेने वाटचाल सुरू आहे. सत्ता नोकरशहांच्या, उद्योगपतींच्या हाती केंद्रित होत आहे. त्यांनी जनतेला लुबाडले नाही तरी जुन्या राजांप्रमाणे तिचा फक्त प्रतिपाळ करायचा. जनशक्तीला स्वतंत्र स्थान नाही. म्हणजे पुन्हा राजसूय यज्ञच. विनोबा म्हणाले होते, प्रजासूय यज्ञ हवा आहे ! भंग्यांच्या, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या हातात सत्ता यायला हवी आहे. कुठे आहेत पवनारला ते भंगी, ते शेतकरी, ते मजूर ?, तेथे जमले सगळे सरकारवाले. मंत्री नाही तर त्यांचे सचीवगण. अनुशासन याचा भले विनोबांना अभिप्रेत असणारा अर्थ स्वयंशिस्त असो. प्रत्यक्षात तिथे दर्शन घडले ते 'मनु'शासनाचे. मूठभरांच्या हातात सत्ता केंद्रित होणे, हे मूठभर वरिष्ठ वर्गाचे आणि वर्णाचे असणे म्हणजे 'मनु'शासन. अनुशासन हवे तर बळजबरी, धाकदपटशा, भीतीचे-संशयाचे वातावरण कमीत कमी हवे; पण याउलट स्थिती, अगदी निरुपद्रवी असणाऱ्या साहित्य-संमेलनादी प्रसंगीसुद्धा जाणवू लागलेली, विनोबांदिकांना अस्वस्थ करीत नाही का ? त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे आणि ती स्वप्ने अजूनही जपू पाहणाऱ्या माणसांना, अनुयायांना, कार्यकर्त्यांना ते जवळही येऊ देत नाहीयेत. अशा विचारांचे कार्यकर्ते जवळ गेले तर ते लगेच सूक्ष्मात जातात आणि दिल्लीवाले जमले की ते पुन्हा स्थूलात उतरायला राजी होतात, हा चमत्कार कसा समजावून घ्यायचा ? परिस्थितीअंगाने केलेला हा विचार पुन्हा म्हणून मूळ प्रकृती धर्माकडे येतो. विनोबांची प्रकृती फक्त दार्शनिकाची, प्रेषिताची, ऋषीची. त्यांनी युगधर्म सांगितला; पण या धर्माची वाट त्यांनी दाखविली नाही किंवा दाखविलेली वाट भलत्याच मुक्कामाला घेऊन जाणारी ठरली.