इंदिरा गांधींनी सत्ता सोडली किंवा त्यांना ती सोडावी लागली तर देशात खरोखरच आकाशपाताळ एक होणार आहे का? आजवर असे प्रसंग आले तेव्हाचा अनुभव काय आहे ? सध्याची परिस्थिती फार आणीबाणीची. नाजूक आणि अभूतपूर्व आहे म्हणजे नेमकी कशी आहे ? इंदिरा गांधी तरी ही परिस्थिती योग्य रीतीने हाताळत आहेत काय ? इंदिरा गांधींशिवाय ही परिस्थिती हाताळायला, तिच्यातून मार्ग काढायला काँग्रेस पक्षात किंवा विरोधी दलात एकही योग्य व पात्र अशी व्यक्ती किंवा व्यक्तिगट उपलब्ध नाही का ? अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा धक्का बसल्यावर सर्वाची पहिली प्रतिक्रिया गोंधळल्याची, गांगरून गेल्याची होणे समजू शकते. एवढ्या खंबीर आणि दृढनिश्चयी पंतप्रधानबाई. पण त्याही निर्णय समजल्यावर दिवस दोन दिवस गडबडल्या-गोंधळल्या. राजिनामा द्यायला निघाल्या; मग मागे फिरून सत्तेला पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट चिकटून बसल्या. मेळावे काय भरवत सुटल्या. विरोधकांचे प्रतीमेळावे मग ओघाने आलेच. पण आता हा सगळा वातावरणातला ताण, उन्माद संपायला हवा आहे. थोड्या व्यवहारी भूमिकेतून विचार व्हायला हवा- खरोखरच इंदिरा म्हणजे भारत हे समीकरण बरोबर आहे का ? आणि बरोबर असल्यास आपल्या लोकशाहीला काही अर्थ आहे का ?
आपल्याला आज तीन गोष्टींची गरज आहे.
१: राष्ट्रीय एकात्मता
२ : परचक्रनिवारण
३ : स्वावलंबी अर्थव्यवस्था.
या तीनपैकी पं. नेहरूंनी आपली फक्त पहिलीच गरज पूर्ण केली, तरी आपण त्यांचे नेतृत्व श्रेष्ठ मानतो. शास्त्रीजींनी पहिल्या दोन गरजा पूर्ण केल्याजरी त्यांचे व्यक्तिमत्त्व पं. नेहरूंपेक्षा खूपच लहान होते- मध्यम दर्जाचे होते. तिसरी गरज मात्र कोणीच पूर्ण करू शकला नाही आणि आज इंदिरा गांधींनाही