'देशातील सर्वश्रेष्ठ सत्ताधारी व्यक्ती आज कलंकित ठरलेली आहे. आम्ही दु:खी आहोत. शरमेने आमची मान आज खाली जात आहे...' बस्स. यापेक्षा निषेधाचा स्वर जराही वर न चढवण्याची. फार तर न्यायमूर्ती सिन्हांच्या नि:स्पृह, रामशास्त्री बाण्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून स्वस्थ राहण्याची.काही काही वेळा मौनच अधिक प्रभावी ठरत असते. तो अनुभव या वेळी घेऊन पाहायचा. त्याऐवजी आजवर शेकडो वेळा केली गेलेली राजिनाम्याची मागणी पुन्हा एकदा तारस्वरात करून विरोधकांनी काय साधले ? अगोदरच या मागणीतला सगळा गंभीरपणा वरचेवर ती केली गेल्यामुळे अगदी नाहीसा झालेला आहे. बाई पुन्हा बोलायला मोकळ्या... 'पहा, विरोधकांना दुसरे तिसरे काहीही नको आहे. त्यांना फक्त मला घालवायचे आहे, मला मात्र गरिबी हटवायची आहे; देश बलवान-समृद्ध करायचा आहे विरोधक आड येतात. त्यांनी मला विसरून काम करावे. तर त्यांनाही यश मिळेल...'
बाईंच्या म्हणण्यात खोल, राजकीय अर्थ आहे, हे विरोधकांनी अजून ध्यानात घेतलेले दिसत नाही.
इंदिरा गांधी सत्ताबाज, भ्रष्ट राजकारणी आहेत हे सांगून सांगून विरोधकाची सत्तापिपासा, भ्रष्टता लपून राहणार आहे का ?
इंदिरा लाट ओसरली म्हणजे विरोधकांची लाट उंचावली असे होते का?
विरोधकांची लाट तेव्हाच उंचावेल जेव्हा विरोधाला काही तात्त्विक अधिष्ठान लाभेल, विरोधकांच्या सेवाभावाची, लोककल्याणप्रवृत्तीची लोकांना रोकडी प्रचिती येऊ लागेल. नाही तर इंदिरा लाट जाईल, दुसरी कुठली तरी येईल. विरोधकांच्या नाकातोंडात पुन्हा पाणी ते पाणीच.
अणि इंदिरा आज-आत्ताच जाण्या न जाण्याने काय फरक पडतो आहे?
झोपडपट्टी वाढायची थांबणार आहे ?
फूटपाथ रिकामे आणि स्वच्छ राहणार आहेत ?
भिकेसाठी पसरले जाणारे हात उद्योगात गुंतणार आहेत ?
हे दारिद्रय, ही विषमता, ही कुरूपता...
इंदिरा गांधी ही वस्तुस्थिती बदलू शकत नाहीत. त्यांचे वॉटर्लू या आर्थिक आघाडीवर आहे. या वॉटर्लूवर त्यांच्याशी खरा मुकाबला केला पाहिजे. विरोधकांनी ही हिंमत बाळगावी. त्यासाठी शक्ती साठवावी. इंदिरेला विसरून काम करावे. इंदिरा-भगाओ सारखे पोरकट कार्यक्रम हाती घेऊन अहमदाबाद-अलाहाबाद येथे मिळालेल्या लहानग्या विजयांची सांडलवण करून टाकू नये...
पान:निर्माणपर्व.pdf/116
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१ जून १९७५
विरोधक । ११५