पान:निर्माणपर्व.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



विरोधक






 अपयशापेक्षा यश, पराभवापेक्षा विजय पचवायला अधिक कठीण असतो असे म्हणतात.
 विरोधी पक्षांच्या बाबतीत हा अनुभव फार येत आहे.

 नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल काय सांगतात ?

 गुजराथमध्ये कॉंग्रेस व विरोधक तसे तुल्यबळ आहेत. निर्णायक पराभव तसा फक्त चिमणभाईंचाच म्हणता येईल. जनता आघाडी इंदिरा काँग्रेसपेक्षा फार पुढे आहे असे नाही. अब्रू बचावली, अस्तित्व टिकून राहिले, पुढच्या प्रयत्नांना थोडा आधार लाभला, ढासळत चालला होता तो आत्मविश्वास सावरला गेला, यापेक्षा जनता आघाडीच्या विजयाला फारसा मोठा अर्थ नाही. हा लहानसा विजय नम्रतेने, जबाबदारीने स्वीकारून, बिहारसाठी, पुढील सार्वत्रिक निवडणुकांसाठी दमदार पायरोवा करण्याऐवजी विरोधक किती एकदम गगनाना गवसणी घातल्यासारखे बोलत आहेत ? काही तर अगदी बरळतच आहेत.

 अलाहबादचा इंदिरा गांधींचा पराभवही तसा मोठा नाही.

 निदान सुप्रीम कोर्टाचा, निवडणुकमंडळाचा निर्णय होईपर्यंत तरी नाही.हे अंतिम निर्णय बाहेर पडायच्या आतच विरोधकांनी इंदिरा राजिनाम्यासाठी किती एकदम हाकाटी चालवली आहे ?
 कोणी म्हणाले : काँग्रेसजनांनी इंदिरा गांधींविरुद्ध आता 'बंड' करावे.
 आणखी कोणी म्हणाले : इंदिरा गांधींनी एक दिवससुद्धा यापुढे संत राहणे 'लांछनास्पद' आहे.

 मोठमोठे शब्द वापरून-वापरून विरोधक त्यातील सगळी ताकदच घलवून टाकीत आहेत.

 ही वेळ खरी तर अगदी शांत राहायची. गजबजलेल्या, रहदारीच्या रस्त्यावर एकदम काही वेळ निःशब्द शांतता पाळून परिणाम साधावा, तशाप्रकारचा कार्यक्रम योजण्याची.

निर्माणपर्व । ११४