पान:निर्माणपर्व.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





साम्यवादी पर्याय नको असेल तर !



 जयप्रकाशांची चळवळ ही हळूहळू उलगडत चाललेली लोकांची चळवळ आहे. एखादी तत्त्वप्रणाली निश्चित करून, तिच्या आधारे लहानसा गट वा पक्ष संघटित करून, लोकांना या गटामागे खेचून आणणारी व शेवटी सत्तासंपादनाचे उद्दिष्ट गाठणारी ही रूढ व आकारबद्ध चळवळ नाही. फॅसिस्ट किंवा कम्युनिस्ट चळवळी या स्वरूपाच्या असतात. याउलट जयप्रकाशांच्या चळवळीचे नाते टिळक-गांधींच्या जनता चळवळीशी अधिक जवळचे आहे. जनतेचे प्रश्न घ्यायचे, तात्पुरत्या संघटना, समित्या तयार करायच्या, प्रश्न बदलले तर हे तात्पुरते संघटनही बदलायचे आणि प्रश्न संपलाच, तर सगळा पसारा विसर्जित करून मोकळे व्हायचे, पसारा असतानाही शक्यतो मोकळे राहायचे, या खास भारतीय पद्धतीने जयप्रकाशांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना हे आंदोलन गोंधळाचे, अस्पष्टसे वाटते. तसे ते आहेही. पण तशी आपली मागची स्वराज्याची आंदोलनेही होती, हे मात्र आपण सहज विसरतो. जे व जेवढे लोक येतील, तेवढयांना बरोबर घेऊन, व्यवहार्य व सर्वांना झेपेल असा कार्यक्रम ठरवून, टिळक-गांधी पुढे जात असत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क मानणाऱ्या टिळकांनी गणपती उत्सवापासून सुरुवात करून स्वदेशी बहिष्कारापर्यंत वाटचाल केली. गांधीजी सत्याग्रहापर्यंत गेले. यातील एकेक पाऊल पुढे पडायला दहा दहा, वीस वीस वर्षे उलटावी लागलेली आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे म्हणजे असा वेळ लागतोच. वाटही अगोदर निश्चित करता येत नाही. उद्दिष्ट तेवढे पक्के ठरवून, मिळेल त्या वाटेने, झेपेल त्या वेगाने चालू लागणे, इतर वाटांनी जाणाऱ्यांचेही जमेल तितके सहकार्य घेत राहणे, वाटचालीत अधून मधून थांबणे, मतभेद शक्य तेवढे मिटवणे, सहकाऱ्यामध्ये एकवाक्यता घडवून आणणे, त्यांना पुढच्या टप्प्यापर्यंत तरी एकत्र ठेवणे, अशी ही आपल्याकडील स्वराज्ययात्रेची पालखी चालली होती. त्यामुळेच आपली स्वराज्ययात्रा ही जनयात्रा ठरली आणि शेवट जवळ आला तेव्हा, सैन्यातल्या शिपायापासून अगदी सर्वसामान्य खेडुतांपर्यंत या यात्रेत सगळेच वर्ग, जाती-जमाती, पक्षोपपक्ष सामील झाले. या जनयात्रेची आठवण व्हावी अशा पद्धतीने स्वातंत्र्यानंतर

साम्यवादी पर्याय नको असेल तर ! । १०३