पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांगतो...मदर इव्हान जाते...निमूटपणे पदरमोड करून घेऊन येते. हे बेळगावात आता रोजचंच होऊन बसलंय.
 हे मला कळायला पण सात-आठ वर्षं उलटून गेली. जेव्हा मी तिच्याबद्दल जाणून घेतलं तेव्हा मला कळलेली तिची रामकहाणी विलक्षण अशीच होती... इव्हानचा जन्म तमिळ ख्रिश्चन कुटुंबात २८ नोव्हेंबर, १९४६ ला मदुराईत झाला. वडील इंग्रज सैन्यात होते. बदलीमुळे तिची व कुटुंबाची फरपट होत राहिली. आज इथं तर उद्या तिथं. वडील पुढे कॅप्टन झाले. बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्रीत बदली होऊन आले. इव्हानला वडिलांनी सिकंदराबाद, बेळगाव जाईल तिथं इंग्रजी शाळेत घातलं. वडील अकाली निवर्तले अन् इव्हानच्या कुटुंबाची वाताहात झाली.
 भाऊ बेळगावच्या हॉटेलमध्ये नोकरी करू लागला. इव्हान कशीबशी मॅट्रिक झाली. टायपिंग शिकली. बेळगावातच एका वकिलाची टायपिस्ट झाली. पाचशे रुपयांच्या तुटपुंज्या पगारात भाऊ व आईचा सांभाळ करू लागली. या साऱ्या धकाधकीत तिचं अकाली प्रौढ होणं स्वाभाविक होतं. आईचं करायचं म्हणून तिनं अविवाहित राहणं पसंत केलं.
 घरातल्या ख्रिश्चन संस्कारामुळे तिला येशू भेटला. तोच तिचा मित्र, सखा, मार्गदर्शक झाला. येशूमुळे तिला जीवनाचा मार्ग सापडला...'खरा देव गरजवंत माणसात दडलेला आहे...तुम्ही त्यांचे करा...तो तुमचा सांभाळ करील' या ओळीवर श्रद्धा ठेवून इव्हान जगत राहिली. चर्चच्या कर्मकांडात प्रार्थनेत वेळ घालवायला परिस्थितीमुळे तिला उसंत अशी मिळालीच नाही. 'भाव तोचि देव' म्हणत दिवस कंठत राहिली.
 पस्तिशी ओलांडत असताना एकदा भाऊ अचानक घरी आला तो इव्हानसाठी लग्नाचं प्रपोजल घेऊनच. 'माझ्या हॉटेलात एक कॅनेडियन गृहस्थ आलेत...वय वर्षे अवघे ६१...त्यांना जीवनसाथी हवीय...ताई तू विचार कर... गृहस्थ सज्जन आहेत.'
 'झट मंगनी पट शादी' होते. डॉ. रेमंड लोमेक्सशी विवाह हा इव्हानच्या जीवनात कायाकल्प घेऊन येतो. अचानक आलेल्या श्रीमंतीनं ती भांबावून जाते; पण हे काही दिवसच...परत येशूच तिला सावरतो. ती आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायचं ठरवते. गोव्यातील कळंगुट बीच हे विदेशी पर्यटकांचं आगर. तिथं भिकारी, बेवारशीही तितकेच. त्यांची सेवा करायची म्हणून ती नर्सिंगचे अनौपचारिक धडे एका हॉस्पिटलमध्ये घेते नि लागते कामाला.

निराळं जग निराळी माणसं/९८