पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आय ऍम डुइंग माय जॉब : इव्हान लोमेक्स

 माणूस तोही एकविसाव्या शतकातला...त्याला 'मी' आणि 'माझं' चा शाप मिळालाय...संवेदना, परोपकार, समाजसेवा, निःस्वार्थी मदत सारे शब्द व्यवहाराच्या शब्दकोशातून रोज एक एक गायब होत आहेत. अशात एक बाई रस्त्यावर बेवारस जीवन जगणाऱ्या लुळ्या, पांगळ्या, अंध, वेडसर, बेवारस लोकांना आपल्या घरी ठेवते. त्यांना खाऊ-पिऊ न्हाऊ घालते. मलमपट्टी, औषधोपचार करत आणि समाजाच्या लेखी उपेक्षित स्त्री-पुरुष जीवांना 'माणूस' बनवते यावर माणुसकीचा पाझर आटलेल्या, वात्सल्यांचे दुवे तुटलेल्या या समाजात कुणाचा विश्वास राहात नाही... हे स्वाभाविकच म्हणायला हवं. मग असं निरपेक्षपणे बेवारसांची सेवा करणाऱ्या इव्हान लोमेक्सला लोक ती धर्मांतर करते...ती किडण्या विकते...ती वेश्याव्यवसाय करते, असे बिनबुडाचे आरोप करत बरळत राहतात. तथाकथित जागरूक पत्रकारही कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता रकाने भरायचा रतीब म्हणून सनसनाटी काहीबाही लिहितात, छापतात...पोलीस ते वाचतात ...आठ...आठ तास तिचा रिमांड घेतात...काहीच हाती येत नाही म्हणून मग सोडून देतात...
 मग इव्हान पुनश्च हरिओम म्हणत बेवारशी नामक जिवंत प्रेताची सेवा पूर्ववत निष्ठेने करत राहते.
 आता ती समाजाच्या लेखी 'बेवारस मदत' होते...आता पोलीसच तिच्या घरात रस्त्यावरील बेवारस जिवंत प्रेत कधी आणून सोडतात...कधी फोन करतात, कधी समाजातला जागरूक (?) माणूसही फोन करून मदरला

निराळं जग निराळी माणसं/९७