पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसण्यात रस नव्हता. त्यांनी पंढरपूर गाठलं...'हेचि माझे पंढरपूर'...त्यांना सूर गवसला. सन १९६५ ला त्यांनी पंढरपूरचं बालकाश्रम आपली सामाजिक प्रयोगशाळा बनवली. पंढरपूरचं वा. बा. नवरंगे बालकाश्रम हे महाराष्ट्रातलं दुसरं बालहत्या प्रतिबंधक गृह. महात्मा फुले यांच्या पुण्यातल्या गंज पेठेतल्या पहिल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची (१८६३) प्रेरणा घेऊन मुंबईच्या प्रार्थना समाजाने सन १८७५ ला ते सुरू केलं होतं. महर्षी कर्वे, पंडिता रमाबाईंच्याही अगोदर सुरू झालेलं हे बालकाश्रम रमाकांत तांबोळी येईपर्यंतच्या ९० वर्षांच्या वाटचालीपर्यंत विनाअनुदानच चालायचं. दादांनी हे पाहिलं. संस्था चालवणं आणि चांगली चालवणं यात अनुदानामुळे फरक पडतो, हे त्यांना अनुभवांती लक्षात आलं होतं. अनुदानाचा पहिला चेक तीन लाखांचा पाहून संस्था चालकांचे डोळे पांढरे व्हायची पाळी...आजवर ते मदत पेटीतील १०-१० पैशाच्या लोकाश्रयावर संस्था चालवायचे... राज्याश्रयामुळे संस्था राजस झाली. दादांनी पाहिलं...संस्था एकत्र कुटुंबासारखी चालते. पाळणाघर, रिमांड होम, बालगृह, वृद्धाश्रम, आधारगृह, शाळा, दवाखाना, बंदी स्त्रियांचं आधारालय, बालमंदिर... काय नव्हतं त्या संस्थेस? पण कुणाचा पायपोस कुणाला नव्हता. त्यांनी संस्थांचे विकेंद्रीकरण केलं. कर्मचारी नेमले. त्यांना पगार, अनुदान मिळवलं आणि दयेवर चालणाऱ्या संस्था त्यांनी स्वाधार केल्या. दादा म्हणजे अर्थव्यवहाराचे कौटिल्य आणि लोकव्यवहारातील चाणक्य! त्यांनी मुलींना चप्पल्स दिल्या, त्यांना नर्सिंगचं प्रशिक्षण दिलं नि स्वयंसिद्ध बनवलं. दादांच्या लेखी कधी आपपर भेद नसायचा; पण ते संकटग्रस्तांचे वकील होते. अडचणीत आलेल्याला आधार...मग तत्त्व, कायदा, नियम रद्द. मानव अधिकाराची अंमलबजावणी होण्यापूर्वी यांचं मानव कल्याण सुरू होतं. मुलांचं दत्तकीकरण, मुलींची लग्नं, परित्यक्तांना स्वावलंबी करणं ही कामं तर त्यांनी केलीच; पण संस्थेतील मुला-मुलींच्या प्रत्येक मंगल-अमंगल क्षणी ते 'बाप' म्हणून धावत गेले. पदरमोड करून लग्नं, मुंज, बारसं, वास्तुशांती, दिवस काही असो ते घरचे म्हणून दत्त! तुम्ही बोलवायला विसरलात अन् त्यांना नुसता कार्यक्रम कळला तरी हजर. मानपान, पद, प्रतिष्ठा या पलीकडे 'माणूस' म्हणून जगणं आणि जगवणं हे त्यांच्या जीवन व कार्याचं निराळेपण! नसलेल्यांचं निराळं जग उभारणारा हा विश्वामित्र! प्रतिसृष्टी निर्माण करण्याची त्यांची तपश्चर्या कोणतंच प्रलोभन रोखू शकली नाही. पण आणीबाणीनं डाव साधला. त्यांच्यावर बालंट आणलं; पण ते डगमगले नाहीत. तुरुंगवासानंतर हक्काची लढाई हरले... कायदा कधी कधी सत्याचं शिवधनुष्य पेलण्यास अपुरा

निराळं जग निराळी माणसं/९५