पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वन मॅन आर्मी : रमाकांत तांबोळी

 अहमदनगर व बारामतीची 'रिमांड होम्स', पंढरपूरचं 'बालकाश्रम', पुण्याची 'विद्यार्थी सहाय्यक समिती' व सह्याद्री हॉस्पिटल्सचं 'समवेदना', अहमदनगरचंच 'स्नेहालय' व मैत्रेय फाऊंडेशन या नि अशा अनेक छोट्या मोठ्या संस्था नि उपक्रमांची नावं सांगता येतील जिथं रमाकांत तांबोळी नावाचे सामाजिक कार्यकर्त्यांचा पिंड व पीळ असलेले अधिकारी, प्रशासन, समन्वयक, पर्यवेक्षक, अधीक्षक अशा नानाविध भूमिका वठविणारे एक सद्गृहस्थ गेले नि त्या संस्था, उपक्रमांचं सोनं झालं...त्यांचा कायापालट झाला. एक माणूस जेठा मारून उभा राहिला की, संस्था बदलते. यात त्या माणसाची बांधिलकी, समर्पण, कर्मनिष्ठा कारणीभूत असते. हा माणूस मुळातच कळवळ्या जातीचा. वरून कठोर आतून प्रेमळ, गैर वागलात, तर फाशी; सदाचार केलात, तर शाबासकी, प्रोत्साहन, साहाय्य ठरलेलं! त्याच्या स्पष्टवक्तेपणाचा कानाला त्रास होतो खरा; पण त्यात कडू औषधाचं रोगनिवारण तत्त्व ठासून भरलेलं असतं. आम्ही त्यांना 'दादा' म्हणायचो, पंढरपूर बालकाश्रमातले सर्व जण...दादांच्या औषधाचा गुण मात्र ठरलेला. त्यांचा एक डोस पोलिओ प्लसच्या डोसासारखं काम करतो...आयुष्यभर प्रभावी आणि परिणामकारी! रमाकांत तांबोळी म्हणजे 'वन मॅन आर्मी'... या आर्मीत भरती व्हावं लागत नाही. तुम्ही आपसूकच त्यांच्या सोशल आर्मीमध्ये सामील होता. या आर्मीचा स्वघोषित कमांडर पुकारा नाही करत...आदेश नाही देत...तो पोटात शिरतो नि तुमचं हृदय परिवर्तन करतो. त्यासाठी तो मधाळ वगैरे नाही बोलत...एलआयसी एजंटसारखं तो रोखठोक सांगतो... "हे सत्कार्य आहे, कामाला पैशाची गरज

निराळं जग निराळी माणसं/९३