पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठेपण त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मोहळात आहे. पोळ्यावर दगड मारला की, माशाचे थवे घरघरू लागतात. तसे अजीजभाईंच्या निरोपावर सारं पंढरपूर हलतं-डोलतं! खरं म्हणजे ते कोणत्याच संस्थेचे कुठलेच पदाधिकारी नाहीत. 'इदं न मम' याची खात्री म्हणजे अजीजभाई भयाणी! आता त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा वसा तिसऱ्या पिढीत पोहोचला असल्याने ते 'पंढरपूरचे पब्लिक पप्पा' झालेत.
 मुलगा आमीर, सून अश्रफ, नातू राहील, नात शार्मिन साऱ्यांमध्ये पप्पांचं हे पब्लिक ओपिनियन उतरलंय. आपण पूर्वजांच्या इस्टेटीचे वारस असतो. अजीजभाईंचं सारं कुटुंब त्यांचं सोशल गुडविल जपतं आहे. मला अजीजभाईंबद्दल जो अतीव आदर आहे तो एकाच कारणासाठी...पन्नास वर्षांत या माणसामध्ये वय सोडता बाकी कशातच बदल झाला नाही... तोच पांढरा शर्ट, विजार...तोच धर्म, जात निरपेक्ष व्यवहार, तीच सचोटी... तेच करणं आणि नामानिराळे राहणं, रोज उद्या काय करायचं, याचा विचार. समाजात असा एक माणूस असतो, म्हणून लक्षावधी चुका झाल्या तरी जग तरून राहतं...चालत राहतं...विधायक होत राहतं!

•••

निराळं जग निराळी माणसं/९२