पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येतात, तेव्हा अजीजभाई कायम डोळ्याला रुमाल लावून बसलेले असतात. एखाद्यानं आपल्याला सावली मिळावी म्हणून झाड लावावं अन् त्याखाली येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक पांथस्थानं पहुडावं, असा अजानवृक्ष झालेला हा मळा सर्वांच्याच लळ्याचा विषय झालेला आहे.
 अजीजभाईंची स्थिती सध्या 'मी उरलो नावापुरता' अशी झालीय. पंढरपूरमध्ये आता ठरूनच गेलंय...एक अलिखित ठरावच झालेला आहे... रोटरी क्लब, कला मंच, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्र सेवा दल, अपना घर, बालकाश्रम, शाळा, वाचनालय, काव्यवाचन, हस्ताक्षर स्पर्धा, व्याख्यानमाला...तुम्ही पंढरपुरात काही करा...पहिला दाता गृहीतच! तुमचं काम सुरू होऊ दे. न होऊ दे...अजीजभाईंचा मदतीचा हात ठरलेला! हा माणूस काय करत नाही? ज्येष्ठ नागरिक मंच चालवतो, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर योजतो, त्यांना बस, रेल्वे पास काढून देतो. ब्लड ग्रुप तपासून देतो... मधुमित्र मंडळही (डायबेटिस साह्य) आहेच.
 परवा मी फोन केला, "साने गुरुजी वस्तुसंग्रहालय करायचं आहे. साने गुरुजींच्या उपोषणाची माहिती हवीय." दुस-या दिवशी फोन, "तनपुरे महाराजांच्या मठात फोटो मिळाले, पांडूरंग डिंगरे यांचं पुस्तक मिळालं, 'गोफण' साप्ताहिकाचे नसले तरी साप्ताहिक 'हिंदू'चे अंक मिळतील. आणखी काय पाहिजे ते सांगा." यांचं वय पंचाहत्तर. मी साठीतला; पण उत्साह माझ्यापेक्षा त्यांचा अधिक! ही ऊर्जा येते कुठून? हा माणूस प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या हाकेला ओऽ कसा देतो? मुला-नातवांपेक्षा समाजाची चिंता करणारा हा माणूस! असा विचार करत होतो नि त्यांनी आणखी एक सोशल ड्रोन (सामाजिक सुरुंग) टाकला...
 "माझ्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत...मी आजवर जे केलं ते वरवरचं...मला कायमस्वरूपी...माझ्या पश्चात चालत राहील असं काही तरी करायचं आहे. मी चाळीस-पन्नास वर्ष समाज जीवनात घालवली. तितके लाख रुपये मी साठवलेत. त्यातून मला शिक्षण व आरोग्यासाठी चिरस्थायी काही करायचं आहे...तू सामाजिक कामात असतो...सुचव...मी ते करीन."
 या माणसाला दमा आहे. तासातासाला पंप घ्यावा लागतो. तरी या माणसाकडे बटन स्टार्ट स्कूटर नाही...आहे ती ढकल स्टार्ट, राहतं घर भाड्याचं आहे. जागा आहे. पण घर बांधायचं अजूनही लांबणीवर टाकलेलं. या माणसाला मी गेल्या पन्नास वर्षांत तीन शब्दांचं एक पूर्ण वाक्य बोलताना ऐकलेलं नाही. 'हम नहीं, काम बोलेगा' असाच सारा आविर्भाव. या माणसाचं

निराळं जग निराळी माणसं/९१