पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वंचितांच्या व आपदग्रस्तांच्या तिसऱ्या जगाचे लवटे यांनी प्रत्ययकारी चित्रण करून त्यांचा प्रश्न समाजाच्या वेशीवर टांगला आहे. या वंचितांची संख्या मोठी आहे, कारण वरचेवर आत्मकेंद्रित बनत जाणाऱ्या समाजाच्या वर्तनामुळे त्यांच्या संख्येत भर पडते आहे. आज वाढत जाणारा वेश्याव्यवसाय, परित्यक्ता, निराधार व कुमारी माता समाजाच्या अन्याय्य वर्तनाच्या बळी आहेत. त्यामुळे वंचितांची संख्या मोठी, पण त्यामानाने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची आणि सेवाव्रतींची संख्या कमी, अशी विषम परिस्थिती आहे. प्रा. लवटे म्हणतात त्याप्रमाणे समाजातील विकार दूर करण्याची जबाबदारी समाजाचीच आहे, पण समाजाला ही जबाबदारी कळली पाहिजे. समाजाची सद्सदविवेकबुद्धी जागी झाली पाहिजे व समाजाने त्यामागे आपली शक्ती उभी केली पाहिजे. प्रा. लवटे यांचे हे पुस्तक सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तीची विवेकबुद्धी नक्कीच जागी करील व त्यामुळे सेवा करणाऱ्या सामाजिक संस्था व सेवाव्रती कार्यकर्ते यांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी एक अत्यंत चांगले पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.

अशोक चौसाळकर