पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वार्षिक शिबिर, चर्चासत्रे, मेळावे असे कार्यक्रम होत. त्या कार्यक्रमात एकदा विजयाताई लवाटे भेटल्या. त्यांचे कार्य प्रथम ऐकून पुढे पाहून मी प्रभावित झालो, थक्क झालो. हे कार्य महाराष्ट्रातलं सर्वस्वी वेगळे नि साहसाचं समाजकार्य होतं. अशी माझी धारणा नि खात्री झाली. स्वत:पलीकडे पाहण्याचं उपजत शहाणपण विजयाताईंना खरंतर त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीनं दिलं. त्या सधन नसल्या, तरी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या होत्या. वडील लोकल बोर्डात डॉक्टर होते. एल.सी.पी.एस. झालेला तत्कालीन डॉक्टर कंपौंडरसारखाच असायचा. घरी आई नि विजयाताईंसह पाच भावंडं. विजयाताई कशाबशा १९४८ च्या दरम्यान मॅट्रिक झाल्या. सन १९५४ ला प्रभाकर लवाटे यांच्याशी त्यांचं वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे त्या काळात उशिरानंच लग्न झालं. उशिराचं कारण होतं वडिलांची तत्त्वनिष्ठा व ध्येयवाद. 'हुंडा मिळणार नाही, सोनं मिळणार नाही, लग्न साधं करावं लागेल. नारळ व मुलगी देऊ.' अशा अटी असायच्या. त्या अटींसह प्रभाकर लवाटे यांनी लग्न केलं. ते नेव्हीमध्ये होते. संसारात फार रस नव्हता त्यांना. म्हणून मग विजयाताईंनाच घर चालवावं लागायचं.
 सासर अमरावतीचं. सासरची माणसं तुटक वागायची म्हणून विजयाताईंनी मुंबईला संसार थाटला. कुटुंब नियोजनाचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेताच त्यांना मुंबईच्या एस.के. पाटील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन प्रचार कार्यकर्त्यांची नोकरी मिळाली. त्या कामाचे स्वरूप सन १९६० च्या दरम्यान धाडसाचं होतं. वेश्यावस्तीत जाणं, त्यांना आरोग्य, मुलं सांभाळणं, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस उद्युक्त करणं असं काम होतं. वेश्या वस्तीत कुलीन बाईनं एकटं जाणं जीव धोक्यात घालणं होतं; पण विजयाताईंमध्ये उपजव मातृत्व होतं. त्यांनी वेश्या, घरवाली, दलाल, गुंड, पोलीस सर्वांचा विश्वास संपादन करून नेटानं काम सुरू ठेवलं. काही दिवसांतच त्या त्यांच्या झाल्या. हळद-कुंकू, संक्रांत, उपचार, संवाद, चहापान, मदत असा फेर धरत त्या त्यांच्या ताई, आई, आक्का झाल्या. इथं त्यांना वेश्यांच्या दुरवस्थेची कल्पना आली. 'जोवरी पैसा, तोवरी बैसा' असं इथलं जीवन. इथल्या स्त्रिया कोणीही राजीखुशीने या धंद्यात आलेल्या नव्हत्या. गरिबी, दारिद्र्यामुळे विकलेल्या मुली, नोकरीच्या आमिषानं परराज्यातून आणलेल्या, फसगत झालेल्या मुली, नव-यानंच धंद्याला लावलेल्या, पाय घसरल्याने या गर्तेत पडलेल्या. प्रत्येकाची स्वतंत्र शोकगाथा असायची. इथं नरक बरा अशी स्थिती! मिळकतीतले निम्मे पैसे घरवाली म्हणजे जिच्या घरी, खोलीत राहून धंदा करते तिला, घरी पैसे पाठवायची जबाबदारी, स्वत:चा खर्च, आजारपण, नट्टापट्टा सारा खर्च करावा लागायचा.

निराळं जग निराळी माणसं/८४