पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरू करून संस्थेचा समर्थ पर्याय उभा केला. त्यांचं हे कार्य पण लाखमोलाचं मानावं लागेल.
 बालकल्याणाबरोबरच डॉ. गोखले यांनी वृद्ध कल्याण, कुष्ठरोग निवारण या क्षेत्रात केलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य अधिक व्यापक व दीर्घ पल्ल्याचं म्हणून महत्त्वाचं ठरतं. 'युनो'च्या माध्यमातून त्यांनी समाज कल्याणाच्या विविध प्रश्नांवर जनमत तयार करून विकसनशील देशांच्या कल्याणकारी कार्यात विकसित देशांचा जो सहभाग घडवून आणला त्याची नोंद आंतरराष्ट्रीय मान्यतेने होणे गरजेचे होते. युनोपुढे भाषण, काही सन्मान त्यांना लाभले. तरी त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक तोलामोलाचं होतं. हे कुणी नाकारू शकणार नाही.
 एखादा मनुष्य वैयक्तिक आयुष्यात सुलभ स्वास्थ्याच्या शक्यता नाकारून मळलेली वाट न चोखळता त्या वेळी उपेक्षित असलेलं समाजकल्याणाचं क्षेत्र निवडतो, यातच डॉ. शरच्चंद्र गोखले यांचं दूरदर्शीपण दिसून येतं. या वाटेवर त्या काळी काही पायघड्या नव्हत्या. त्या घातल्या जाण्याचीही सुतराम शक्यता नव्हती. पण डॉ. गोखले यांनी आपल्या कार्य-कर्तृत्वाने ती निर्माण केली. यामागं एक ध्यासपर्व त्यांनी कारणी लावलं. खर्ची घातलं. ज्या काळात विदेशी जाणं दुर्मीळ होतं. अशा काळात ते लीलया विदेशी जात राहिले. जग पादाक्रांत करून हा जगज्जेता सेवक सतत कार्यकर्ता राहिला. हे त्यांना लाभलेल्या वडिलांच्या संस्कार व वारसामुळे शक्य झाले, असं त्यांच्या आयुष्याचा धांडोळा घेतल्यावर लक्षात येतं.

•••

निराळं जग निराळी माणसं/८२