पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या बोलण्यातून झरत असायचा. माणसाच्या संकटांच्या काळात भूमिगत राहून कार्य करण्याची त्यांची हातोटी दुर्लभ अशीच होती. मी आमच्या कॉलेजच्या विरोधात एकदा आमरण उपोषणास बसलो होतो. तेव्हा ते दै. केसरीचे संपादक होते. बातमीतून त्यांना समजलं. त्यांनी आपली सारी कोल्हापूरची टीम माझं उपोषण सुटावं म्हणून दिवसरात्र कामी लावली होती. हे मला नंतर कळलं. सहकाऱ्यांना जामीन राहण्यात, रदबदली करण्यात डॉ. गोखलेंचा हात कुणासही धरता येणार नाही.
 शासकीय यंत्रणा हालत नाही. अधिकारी संवेदनशील राहात नाही, याचा त्यांना मोठा राग असायचा. 'पोत्यात सरकी भरल्यासारखे अधिकारी असतात' असे ते नेहमी म्हणत. कायद्याचा अंमल होत नाही त्यानंही ते अस्वस्थ असत. म्हणायचे 'कायदा कधी चालत नसतो. त्याला चालवायला लागतं. आपण जेवढा चालवू तेवढाच तो चालतो' हे त्यांचं सूत्र वाक्य भारताच्या स्थितिशीलतेवरचं जळजळीत भाष्यच होय. बालकल्याण कार्यात शासन, समाज, संस्था, कार्यकर्ते यांना एकत्र आणायचा त्यांचा सतत खटाटोप असायचा. आपल्यासमोर दिलेलं आश्वासन मंत्री पाळत नाही, यांचे प्रायश्चित्त डॉ. गोखले व्यक्तिशः घेत. ते महाराष्ट्र परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, पुणेचे अध्यक्ष होते. महिला व बालकल्याण संचालनालयाचा शुभारंभ समारंभ होता. श्री. रामदास आठवले समाजकल्याण मंत्री होते. त्या समारंभात आम्ही 'समाजसेवा' त्रैमासिकाचे पुनर्प्रकाशन सुरू केलं. मंत्रिमहोदयांनी त्रैमासिकासाठी पंचवीस हजार रुपयांचे साहाय्य घोषित केलं. पण प्रत्यक्षात दिलं नाही. डॉ. गोखले यांनी व्यक्तिशः २५,००० रु. ची देणगी देऊन आश्वासन पूर्ण केलं. मी संपादक म्हणून पाच वर्षांनी 'समाजसेवा' मासिक चालवून ते दामदुपटीनं संस्थेच्या हवाली केले. अशी सकारात्मक उदाहरणं म्हणजे डॉ. गोखले यांच्या समाजशील वृत्तीचा ठळक पुरावाच ना?
 महाराष्ट्रात संस्थाबाह्य बालकल्याण सेवेचे जनक म्हणून डॉ. गोखलेंचे कार्य ऐतिहासिक म्हणावे लागेल. 'कास्प प्लॅन'च्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, समाजकार्य इ. रूपाने जे कार्य केले त्यातून हजारो मुलांचं उपेक्षित बाल्य शिक्षित व संस्कारित झालं. त्यांनी बालकल्याण क्षेत्रात विदेशी पैसा आणून इथं समृद्ध बालपण बहाल केलं. मला ते लेखन, व्याख्यानापेक्षा अधिक सर्जनात्मक वाटत आलंय! 'युनिसेफ'सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने त्यांनी रिमांड होम्समध्ये 'बाल संगोपन योजना'

निराळं जग निराळी माणसं/८१