पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेलन केलर, 'बॉइज टाऊन' चे कार्य करणाऱ्या फादर फ्लॅनॅगानशी संपर्क आाल. यातून डॉ. गोखले यांनी मुलांचे हक्क, बाल मार्गदर्शन, उन्मार्गी मुलांचे प्रश्न, मुलांचे बुद्धिमापन इ. विषयी लिहिले. यातून 'नावडती मुले' सारखे पुस्तक आकाराला आले.
 ज्युव्हेनाइल डिपार्टमेंटचे कार्य सुधार प्रशासन विभागाचा भाग असल्याने त्याचे कार्य तुरुंग, गृह, भिक्षेकरी प्रतिबंध विभागासारखे चालायचे. डॉ. गोखलेंना ते खटकायचे. मुलांकडे दयेने न पाहता शास्त्रोक्त पद्धतीने पाहिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. मुलगा उन्मार्गी होतो, चोऱ्या करतो, शाळेस जात नाही, खोटे बोलतो ही झाली लक्षणे वा प्रतिक्रिया. त्याचे मूळ समाज व घरात असते. व्यसनी आई-वडील, अडाणीपण, दुभंगलेली कुटुंबे, ताणलेली नाती, प्रेमाचा अभाव, दुर्लक्ष, वाईट संगत, आर्थिक ओढाताण, सामाजिक अस्पृश्यता अनेक कारणे असतात मुलांच्या बिघाडाची. डॉ. गोखले यांनी ही जाण विभाग, शासन व समाजास दिली. हे डॉ. गोखले यांचे मोठे सामाजिक योगदान होय. मुलांचे दोष दूर करायचे, तर त्यांच्या मन, भावना, बुद्धी, वृत्ती इ. चा. शास्त्रोक्त अभ्यास व्हावा म्हणून त्यांनी बाल मार्गदर्शन केंद्र (Child Guidance Clinic) रिमांड होम्समध्ये सुरू केले. त्यासाठी बालमानसशास्त्राची नियुक्ती, उपकरणे, खेळ इ. ची रचना केली. 'हसतखेळत क्रीडोपचार' सुरू केला. त्यातून मुलांवरील संस्काराचे महत्त्व डॉ. गोखलेंनी अधोरेखित केले.
 पुढे सन १९५९ मध्ये डॉ. गोखलेंना 'उन्मार्गी मुले व त्यांचे पुनर्वसन' विषयक अभ्यासासाठी युनोची शिष्यवृत्ती मिळाली. त्यात त्यांनी इंग्लंड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इस्त्रायलमधील बालकल्याणाचा अभ्यास केला. नॉर्वेत त्यांनी बालकल्याण मंडळाचा अभ्यास केला. डॉ. निकवाल यांचे मनोव्यथित व उन्मार्गी बालकांचे कार्य पाहिले. फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे विविध संस्थांना भेटी दिल्या. उत्तर ध्रुवाकडील रोवोनियामीच्या लॅप लोकांचे समाज विकास कार्य पाहिले. इस्त्रायलमध्ये त्यांनी किबुत्झ (समूह जीवन) चा अनुभव घेतला व अभ्यास केला. इंग्लंडमध्ये संस्था, तुरुंग, होम डिपार्टमेंटचा अभ्यास केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या चर्चासत्रात भाग घेतला. या कार्यानुभवाने त्यांना बालकल्याणाची शास्त्रीय दृष्टी दिली.
 डॉ. गोखले पुढे भारतीय समाजकल्याण संस्थेचे कार्यकारी सचिव झाले. त्या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलांच्या दत्तक प्रक्रियेची कार्यपद्धती विकसित

निराळं जग निराळी माणसं/७९