पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरोध करण्याच्या प्रकरणात न्यायालयाने ताशेरे झोडले. मग ब्रिटिश शासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करून या कामात आणले. तेव्हा कानजी द्वारकादास यांच्या पुढाकाराने १ मे, १९२७ रोजी 'चिल्ड्रन्स एड सोसायटी' स्थापन केली. डेव्हिड ससून रिफॉर्मेटरीचे रूपांतर 'डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल स्कूल' मध्ये करण्यात येऊन त्याला, 'रिमांड होम'चा दर्जा देण्यात आला. ते महाराष्ट्रातले पहिले रिमांड होम होय. अशा संस्थांचे जाळे विकसित करण्यासाठी १० एप्रिल, १९३१ रोजी 'बाँबे प्रेसिडेन्सी बोर्स्टल असोसिएशन'ची स्थापना करण्यात आली. त्या संस्थेच्या पुढाकाराने पुढे पुणे, सोलापूर, अहमदनगर, अहमदाबाद, बेळगाव, विजापूर येथे रिमांड होम्स सुरू करण्यात आली. भारत स्वतंत्र होईपर्यंत या संस्था तत्कालीन 'बॅकवर्ड क्लास वेल्फेअर'मार्फत कार्यरत होत्या. हा विभाग गृह खात्याच्या अखत्यारीत असायचा. स्वातंत्र्यानंतर या विभागाचे विभाजन होऊन 'ज्युव्हेनाइल अँड बेगर्स डिपार्टमेंट' स्वतंत्रपणे सुरू झाले व डॉक्टर गोखले त्याच दरम्यान विभागात दाखल झाले.
 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून शिकून प्रशिक्षित झालेल्या द. वि. कुलकर्णी, गोविंदराव हर्षे, राम बेलवडी, शं. वि. जोशीराव, शरच्चंद्र गोखले हे पंचायतन त्या वेळी मुंबई इलाख्याचं बालकल्याण कार्य पाहायचे. डॉ. गोखले पुण्याच्या रिमांड होमचे चीफ ऑफिसर म्हणून नेमले गेले व त्यांचा बालकल्याणाशी प्रत्यक्ष संपर्क आला. पुण्याच्या डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशनच्या वतीने त्या वेळी शिवाजीनगरचं मुलांचं रिमांड होम, नव्या पेठेतलं मुलींचं रिमांड होम, एक आफ्टर केअर हॉस्टेल व किवळे येथे एक प्रमाणित शाळा (सर्टिफाईड स्कूल) चालविली जायची. डॉ. गोखले यांच्या अखत्यारीत या संस्था कार्यरत होत्या. गोखले यांनी आपल्या पूर्वसुरींच्या परंपरा सांभाळत बालसप्ताह, बालकल्याण प्रदर्शन, बाल न्यायालय, बाल मार्गदर्शन केंद्र, असे उपक्रम सुरू करून या संस्थांत समाज सहभाग वाढविला.
 याच काळात डॉक्टर गोखले, दैनिक केसरी, दैनिक सकाळ, साधना साप्ताहिकांत किर्लोस्कर मासिके यातून मुलांविषयी लिहीत. वसंत व्याख्यानमालेत भाषणे देऊन मुलांच्या प्रश्नांविषयी समाज प्रबोधन कार्य करत. मग त्यांनी 'समाजसेवा' हे त्रैमासिक सुरू केले. आरंभी त्यात इंग्रजी व मराठी लेख असत. ते चक्रमुद्रित त्रैमासिक होते. पुढे ते केसरी प्रेसमध्ये छापलं जायचं. त्या वेळी १२०० प्रती छापल्या जायच्या. हे त्रैमासिक गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र अशा तिन्ही प्रांतांतल्या समाजकल्याण संस्था व कार्यकर्त्यांचं मुखपत्र बनलं. या मासिकाच्या निमित्ताने डॉ. गोखलेंच्या अंध व मूक बधिरांचे कार्य करणाऱ्या

निराळं जग निराळी माणसं/७८