पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्राच्या बालकल्याणाचं भीष्माचार्य : डॉ. शरच्चंद्र गोखले

 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ म्हणून लौकिक असलेले डॉ. शरच्चंद्र गोखले यांचा महाराष्ट्राच्या बालकल्याणात सिंहाचा वाटा आहे. सन १९५० चा काळ असेल, डॉ. गोखले मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून अडीच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तत्कालीन मुंबई इलाख्याच्या 'ज्युव्हेनाइल अँड बेगर्स डिपार्टमेंट' मध्ये 'ऑडिट ऑफिसर' म्हणून रुजू झाले होते. बालकल्याणाच्या दृष्टीने तो काळ संक्रमणाचा होता. मुंबई इलाख्यात अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांच्या कल्याणाचे, संस्थात्मक कार्य सुरू झाले ते सन १८५७ साली. हे वर्ष भारतीय राजकीय स्वातंत्र्याच्या इतिहासात जसे बंडाचे वर्ष मानले जाते, तसे बालकल्याण क्षेत्रात क्रांतीचे. या वर्षी उन्मार्गी मुलांच्या संगोपन, प्रशिक्षण, संरक्षण व पुनर्वसनाच्या हेतूने मुंबईच्या माटुंगा उपनगरात 'डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी' नावाची पहिली बालकल्याण संस्था मुंबई इलाख्यात सुरू झाली. या संस्थेत राहून प्रशिक्षित व मोठ्या झालेल्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवायच्या हेतूने सन १९१५ ला कर्नल लॉईड यांच्या पुढाकारातून माटुंग्याच्याच किंग्ज सर्कल (आत्ताचे माहेश्वरी उद्यान) जवळील बी.आय.टी. ब्लॉक्समध्ये 'शेपर्ड आफ्टर केअर होस्टेल' च्या रूपात सुधारगृहातून मुक्त झालेल्या उन्मार्गी प्रौढ युवकांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनाच्या दृष्टींनी संस्था सुरू करण्यात आली. सन १९२४ मध्ये ब्रिटिशांनी इंग्लंडच्या 'चिल्ड्रन ऍक्ट'च्या धर्तीवर 'मुंबई मुलांचा कायदा अमलात आणला'; पण तो कागदावरच होता. मिस. के. डेव्हिस या सामाजिक कार्यकर्तीच्या 'लीग ऑफ मर्सी' संस्थेच्या पुढाकाराने दोन अल्पवयीन स्कॉटिश मुलींना वेश्या व्यवसायात गुंतवण्यास

निराळं जग निराळी माणसं/७७