पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळतं म्हणून नव्हे. या संस्थांना त्यांनी गांधीवाद जीवन शिक्षणाची जोड दिली. अनुदान, देणगीशिवाय संस्थेची कमाई हवी म्हणून त्यांनी शेती केली. पिठाची गिरणी सुरू केली. पोल्ट्री चालवली, नर्सरी जोडली. म्हणजे तिथेही त्यांनी स्वत:ला व संस्थेस सतत समाजाशी जोडलं. गारगोटीस समवायी शिक्षणाचं केलेलं संशोधन आयुष्यभर कृतीत उतरवलं. त्यांच्या साधेपणा नि सभ्यतेचा दरारा साऱ्या जिल्ह्यालाच नाहीतर राज्याला होता. आदर्श अध्यापक, दलित मित्र, सावित्रीबाई फुले पुरस्कार, 'लर्नेड एशिया' मध्ये समावेश, आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता यादीत अंतर्भावाने सन्मानित होऊन त्या सदैव नम्र राहिल्या. नोकरी इमानेइतबारे करत त्यांनी आपलं समाजभान जपलं. आयुष्यभर खादी वापरली. गांधीवादी मूल्य व व्यवहारांनी त्यांचं सारं आयुष्य भारलेलं राहिलं. आजच्या आत्मकेंद्रित जगात कुमुदताई रेगेंचं जीवन कार्य, विचार, व्यवहार एखाद्या आख्यायिकेसारखे वाटतात खरे. पण ते आहे अविश्वसनीय प्रखर वास्तव! त्या तेजात पुढील अनेक पिढ्या आपला मार्ग शोधतील, तर जागतिकीकरणातही त्यांचं मनुष्यपण हरवणार नाही, हरणारही नाही.

•••

निराळं जग निराळी माणसं/७०