पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टिकलं. मॅट्रिक होऊन त्या सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकल्या. इथं प्रिन्सिपॉल गोकाकांची दीक्षा अन् दिशा त्यांना लाभली. 'चले जाव', 'भारत छोडो' आंदोलनात त्या सहभागी झाल्या नि त्यांच्यात समूह कार्याचं महत्त्व विकसित झालं. डॉ. व्ही. के. गोकाकांनी कुमुदताईंच्या वडिलांना आंदोलनातील सहभाग कळवला. वडिलांनी उत्तरास मुलीस आशीर्वाद देत उत्तर लिहिलं, 'May God bless you and keep you to the right path' प्राचार्यांनाही कुमुदताईंच्या वडिलांचा अभिमान वाटला. कुमुदताईंनी कॉलेजचं शिक्षण करत राष्ट्र सेवादल, शिबिरं, व्याख्यानं, थोरा-मोठ्यांच्या सहवासात राहणं, शिकणं सुरू ठेवलं. सन १९४४ ला त्या बी.ए. झाल्या नि कोल्हापूरच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका झाल्या. इथं मन लावून अध्यापन केलं; पण त्यांची आंतरिक ऊर्मी समाज कार्याकडे असल्यानं त्यांनी कस्तुरबा ट्रस्टमार्फत चालणाच्या ग्रामसेविका विद्यालयातून समाजसेवेचे धडे गिरवायचं ठरवलं नि त्या सासवडला प्रेमाताई कटकांच्या आश्रमात दाखल झाल्या. इथे त्यांना शंकरराव देव, आचार्य स. ज. भागवत, आचार्य शं. द. जावडेकर यांचा सहवास व संस्कार लाभला नि त्यांची गांधीवादी ग्रामीण कार्यकर्त्यांची मूस तयार झाली. इथलं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी लांजे जि. रत्नागिरी येथे कस्तुरबा ग्रामसेवा केंद्र सुरू केलं. या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न, व समस्यांची उकल करायला हात घातला. आहार, उपचार, आरोग्य, प्रसूती, शेती अशी अनेक कामं या काळात केली. पुढे स्त्रियांसाठी लोकल बोर्डमार्फत कताई प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. या सर्वांतून कुमुदताईंच्या लक्षात आलं की, ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारणार नाही. हा काळ १९४६-४८ चा होता. त्यासाठी गांधीजींच्या जीवन शिक्षण पद्धतीचा अभ्यास करावा, असं त्यांच्या मनानं घेतलं. त्या अभ्यासक्रमास म्हणजे 'डिप्लोमा इन बेसिक एज्युकेशन'ला त्यांना प्रवेश घ्यायचा होता. चौकशी करता कुमुदताईंच्या लक्षात आलं की, हा डिप्लोमा बी.टी. झाल्यावरच करता येतो. म्हणून मग त्यांनी पुण्याच्या 'टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन'ची वाट धरली. सतत गांधीवाद हाच एक त्यांचा ध्यास होऊन राहिला. बी.टी. होताच त्या सन १९५० ला बॅग, बिस्तरा, बादली घेऊन बोर्डीला दाखल झाल्या. तो झपाटणारा काळ होता खरा! प्राचार्य सुलभा पाणंदीकर, ग. ह. पाटील यांचं सान्निध्य व मार्गदर्शन त्यांना इथं लाभलं. याच काळात ताराबाई मोडक, अनुताई वाघ त्यांना भेटल्या. कोसबाडचं त्यांचं कार्य पाहिलं व आपणही असं समर्पित वृत्तीनं कार्य केलं पाहिजे, असं त्यांना मनस्वी वाटू लागलं. कुमुदताई सारं

निराळं जग निराळी माणसं/६६