पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोकणच्या कस्तुरबा : कुमुदताई रेगे

 ध्येयवादी माणसं जन्मत:च तशी असतात की घडतात याची उकल ज्यांना करून घ्यायची आहे, त्यांनी गांधी विचारांच्या सेवाभावी कार्यकर्त्या कुमुदताई रेगे यांचं जीवन समजून घेतलं पाहिजे. त्यांना मी सन १९८५ च्या दरम्यान ओळखू लागलो असलो तरी प्रत्यक्ष संपर्क सन १९९० चा. आमच्याकडे तेरेदेस होम्स संस्थेचं कार्यकर्त्यांचं निवासी शिबिर होतं. दोन दिवस त्या आमच्या कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात राहिल्या होत्या. त्या दोन दिवसात माझ्यात लक्षात आलं की, सत्तरीतल्या या कार्यकर्त्या...मोठ्या चौकस, तळमळीच्या, स्पष्ट विचारांच्या, पण त्याचं भांडवल न करता त्या आपले मूल्य, विचार जपायच्या...जगायच्या. पावलापुरता प्रकाश असा त्यांचा व्यवहार होता. इतरही अनेक कार्यकर्ते असेच. ज्यांनी मला समर्पित कार्यकर्ता बनवल त्यात कुमुदताईंचा सिंहाचा वाटा.

 कुमुदताईंचे वडील अनंतराव रेगे सच्चे गांधीवादी कार्यकर्ते. आचारविचारांचं अद्वैत म्हणजे त्यांचं जीवन व कार्य. आपले संस्कार मुलांना त्यांनी जाणीवपूर्वक दिले; पण विचारस्वातंत्र्यही राखलं. बालपणी चांगली पुस्तकं हाती दिली. थोरामोठ्यांना दाखवलं-ऐकवलं. देशी कपडे घातले की प्रशंसा, विदेशी घातले की तुच्छता व्यक्त करणं. यातून त्यांनी आपली कन्या कुमुदला विधिनिषेध समजावला. कुमुदताई शिकत असतानाच ध्येयवादी बनत गेल्या. वक्तृत्वाची कला त्यांनी शालेय वयात जोपासली. त्या कौशल्यानं त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न दिलं. वाचन अंगात मुरलं याच वयात. ते आयुष्यभर

निराळं जग निराळी माणसं/६५