पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्यकर्ते होते. त्यांनी त्यांना मन रमावं म्हणून सेवा दलाच्या शिबिरात येण्यास सुचवलं. मुंबईच्या वडाळा कॅम्पमध्ये शिबिर होतं. तिथे त्यांनी साने गुरुजींचे विचार ऐकले. गीता प्रवचनं होती ती. त्यांनी समाजकार्य करण्याचं ठरवलं.
{{gap}सांगलीजवळ हरिपूरला कृष्णाताई केतकर निसर्गोपचार शिकवत. तिथे त्यांनी प्राथमिक धडे घेतले. इथे त्यांची चंद्राताई किर्लोस्करांशी ओळख झाली. त्या त्यांना कोल्हापूरच्या विनयकुमार छात्रालयातील कार्यकर्ता आश्रमात घेऊन गेल्या. तिथं त्यांची सर्वोदय कार्यकर्ते मामा क्षीरसागर, बाबा रेडीकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्या ओळखीनं त्या नागपूरला कमलाताई होस्पेटांच्याकडे गेल्या. दोन वर्षांचे नर्सिंग करून परतल्या. कारण त्यांनी जातानाच परत येऊन कोकणात सेवाकार्य करण्याचं ठरवून टाकलं होतं. ते १९५१ चं वर्ष होतं. रत्नागिरीच्या मूर येथे राष्ट्र सेवादल शिबिर होतं. तिथं त्या सहभागी होत्या. शिबिर सुरू असताना गावात एक बाई अडल्याचं कळताच त्या गेल्या व तिला मोकळं केलं. त्यांना सूर सापडला. अशा घटनेनंच त्या नर्सिंगकडे वळल्या होत्या.
 सन १९५४ मध्ये त्यांनी देवरूखला दोन कॉटचं छोटं प्रसुतिगृह सुरू केलं. मामा क्षीरसागरांनी त्याला नाव दिलं 'मातृमंदिर'. तो काळ पांढरपेशा बाईंनी एकटं रानावनात, दऱ्या खोऱ्यात जाऊन सेवा करायचा नक्कीच नव्हता. तेही जात, धर्म, गरीब, श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य भेद न मानता; पण इंदिराबाई हळबे बोलावणं आलं की काळ, वेळ न पाहता वाडी, वस्तीत पोहोचत. १०-१० मैल ऊन, पाऊस, थंडी न पाहता त्या पायपीट करायच्या. काम वाढलं तशी गरजही वाढली. म्हणून मावशींनी काही सहकाऱ्यांना घेऊन संस्थेची स्थापना, नोंदणी सोपस्कार केले. सन १९५६ ला हा उपचार पूर्ण होताच त्यांनी रिंगण रुंद करायला सुरुवात केली. सुतिकागृह, दवाखाना, माहेर, साम्यकुल, दुग्धशाळा, प्रसाद, बालवाडी, गोकुळ, बालवाचनालय, शेती विभाग, दुकान (औषध, वस्तू इ.) 'गरज तिथे काम' या तत्त्वानुसार ओणी, हिंदळे, मुणगे, ताम्हाणे, वडवली इ. ठिकाणी शेती, वनीकरण, जलस्वराज्य, गावतळी, नाला बंडिग काय नाही केलं? शिवाय मातृमंदिर, गोकुळमध्ये अनाथ मलं, मुलींचा सांभाळही. बाळ-बाळंतिणींची शुश्रुषा, वेळ मिळाला की आंबा, फणस पोळ्या, गरे तळणे, आमसूल वाळवण एक ना दोन, हजार कामं न थकता करताना पाहून लोक थक्क व्हायचे ...पाहूनच थकायचे.
 त्यांच्या कामाची माहिती समाजास होईल तशी लोकांनी सढळ हातानं मदत देऊ केली. भावना एकच असायची. एक बाई इतकं काम करते तर

निराळं जग निराळी माणसं/६१