पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मातृमंदिरच्या मावशी : इंदिराबाई हळबे

 माणूस सामाजिक काम का करतो? याचं उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असलं, तरी एक नक्की असतं की, उपजत तिच्यात आपल्या पलीकडे पाहण्याची, विचार करण्याची, कार्य करण्याची वृत्ती असते. ती व्यक्ती समाजकार्य करू लागायला एखादी घटना कारणीभूत होते इतकंच. देवरूख (ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) इथं असलेल्या अनाथ निराधार मुले, मुलींचे संगोपन, समाजातील गरजूची शुश्रूषा व परिसरातील शेती, विहिरी, बंडिंग, फळबाग इ. स्वरूपाचं पर्यावरण व शेती विकासाचे काम ज्या 'मातृमंदिर' संस्थेमार्फत सध्या चालतं, त्याचा प्रारंभ मात्र इंदिराबाई हळबे नामक एका सामान्य स्त्रीच्या व्यक्तिगत पोकळीतून झाला खरा; पण 'कोकणच्या मावशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असामान्य कर्तृत्व, सेवा, समर्पण, शुश्रूषा करणाऱ्या या समाजसेविकेनं कोकणचा दुर्गम प्रदेश गरजू व अडलेल्यांसाठी सुगम केला खरा!
 रत्नागिरीजवळ असलेलं एक छोटं खेडं. केळ्ये-माजगाव त्याचं नाव. या दुर्गम खेड्यात इंदिराबाई हळबे तथा मावशींचा जन्म सन १९१४ ला झाला. तिसरीपर्यंतचं त्यांचं शिक्षण केळ्ये-माजगावला झालं. त्या मामा-मामींकडे असताना त्यांचं वयाच्या १४ व्या वर्षी सन १९२८ ला लग्न झालं. सन १९२८ ते १९३९ पर्यंतचा त्यांचा सांसारिक काळ सुखाचाच म्हणायचा. दोन मुलं झालेली; पण ती दगावली. पुढे पतीही गेले तेव्हा पदरी मीना होती. त्या मुंबईहून देवरूखला आल्या तेव्हा १९४२ चे युद्ध सुरू होतं. मुलीला शिकून डॉक्टर व्हायचं होतं. पण तीही दगावली तशी इंदिराबाईंनी हाय खाल्ली. पण मग हिय्या केला. आपणच नर्स व्हायचं. भास्कर आठल्ये म्हणून राष्ट्र सेवादलाचे

निराळं जग निराळी माणसं/६०