पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना

 भारतीय समाज वा जगातील इतर कोणताही समाज त्या अर्थाने परिपूर्ण नाही. या समाजात समाजानेच निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे अनेक लोक अत्यंत दुर्दैवी जीवन जगत आहेत. रोज आपले चाकोरीतील जीवन जगणाच्या समाजापेक्षा या वंचित लोकांचे जग हे निराळे जग आहे. त्यात वेश्या आहेत, निराधार व अपंग आहेत. मनोरुग्ण व वेडे आहेत. समाजाने अनेक प्रकारे व अनेक रितीने झिडकारलेले हे लोक आहेत. ती माणसंच आहेत, पण त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नाही. त्यामुळे उपेक्षितांचे जग निराळे व दुर्लक्षित आहे. या निराळ्या जगाला माणुसकीची वागणूक देणारी, त्यासाठी आपले तन, मन, धन अर्पण करणारी सेवाभावी माणसे व काही संस्था आहेत आणि या लोकसेवकांचेही स्वत:चे असे निराळे जग आहे. या निराळ्या जगावर व निराळ्या माणसांवर या दोन्ही जगांचे प्रतिनिधित्व करणारे थोर समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या समर्थ लेखणीद्वारा प्रकाशझोत टाकला आहे.
 प्रा. लवटे यांनी यातील अनेक लेख मुंबईच्या 'प्रहार' या दैनिकासाठी लिहिले. 'प्रहार' मध्ये प्रकाशित लेख आणि काही हस्तलिखित लेख एकत्र करून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक त्यांनी उसवलेले आयुष्य सोसणाऱ्यांना आणि ते शिवणाऱ्या टाक्यांना म्हणजेच ते टाके घालणाऱ्यांना अर्पण केले आहे. कारण उसवलेल्या आयुष्यास सोसणाऱ्यांचे जग निराळे आहे. तसेच कर्तव्यबुद्धीने ते उसवलेले आयुष्य मोठ्या जिकिरीने शिवणारी माणसे निराळी आहेत. आपल्या प्रारंभीच्या निवेदनात श्री. लवटे सांगतात की असे निराळे जग ते लहानपणापासून बघत होते. त्याचप्रमाणे ते हेही बघत होते की आपल्या भाळी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रिमांड होममधील अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहोचले आहेत. 'दैवायत्तं कुले जन्मः, मदायतं तु पौरुषम्' हे कर्णाचे 'वेणीसंहार' या नाटकातील वाक्य