पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नॉर्वे, फिनलंड असे छोटे बेटसदृश देश अभ्यासले तरी ते लक्षात येतं. आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. या शतकाचं वर्णन सूचना व संपर्क क्रांतीचं शतक म्हणून केलं जातं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इंटरनेट, सायबर कल्चरचा विकास करून न्यायदानात गती, तपासात तेजी, संपर्कात क्रांती आणणं शक्य आहे. तुरुंगाचीच यंत्रणा साधनसंपन्न होईल तर तारखा, पुरावे, खटले, निकाल यात समन्वयाने गती आणणे शक्य आहे. तुरुंगात न दिसणारी भावनिक, मानसिक ताणतणावांची शिक्षा, तिचा विचार, तिची भरपाई तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुरुंग प्रशासनाच्या रडारवर प्रत्येक बंदी रोज असेल. हे अवघड असलं तरी अशक्य नाही. गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची व भक्कम आर्थिक तरतुदीची. तुम्ही देशातील प्रत्येकाचा विचार 'माणूस' म्हणून जेव्हा करू लागता तेव्हा प्रश्न निष्प्रश्न होतात व बंदिजन माणसं!

•••

निराळं जग निराळी माणसं/५७