पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजात भावसाक्षरता उंचवायला हवी. त्यासाठी समाजाचा संवेदनासूचकांक वाढायला, वधारायला हवा.
 तुरुंगात स्त्री-पुरुषांचे स्वतंत्र विभाग असतात. अलीकडे स्त्री कर्मचारी नियुक्त होत आहेत. किरण बेदी, मीरा बोरवणकर, यांच्यासारख्या स्त्री अधिकारी तुरुंग महानिरीक्षक झाल्यापासून पुरुषसत्ताक तुरुंग मातृसत्ताकतेकडे झुकत आहेत. हे सारं मानवाधिकार जागृती, जबाबदारी, लोकशिक्षण यातून घडत आहे. हे आपणास विसरून चालणार नाही. तुरुंगातील विद्यमान सर्व सुविधा या मानवाधिकार संकल्पनेचा विकास आहे. पूर्वी ग्रॅमवर आहार मिळायचा. त्याचे रूपांतर आता कॅलरीत झालं आहे. पूर्वी पोट भरण्यावर भर होता 'आता चवीचे खाणार त्याला तुरुंग देणार' अशी स्थिती. स्वयंपाकगृह किती आधुनिक होत आहेत. ते गॅस, जनरेटरवरून लक्षात येतं नि तिथल्या पीठ चाळायचं, दळायचं, मळायचं यंत्र, मोठाले कुकर्स, ग्रील्स पाहिलं, डायनिंग हॉल पाहिले की, लक्षात येतं. पूर्वी वाढलं जायचं. आता भोजन दिलं जातं हा फरक. तरी विदेशी तुरुंगासारखं अजून आपणाकडे "Living, Eating, Drinking by choice" आलेलं नाही. ते येईल तो मानवाधिकाराचा विजयदिन असेल.
 तुरुंगात राहणारी व काम करणारी दोन्ही माणसंच असतात. दोघांच्या भूमिका भिन्न असतात. जबाबदाऱ्या निश्चित असतात. तुरुंगाचं सारं साम्राज्य नियंत्रणाच्या होकायंत्रावर पेललेलं असतं. एक साधी गोष्ट मी निरीक्षणातून नोंदलेली सांगतो. तुरुंगाची सारी मदार असते ती कुलूप किल्लीवर, तुरुंगाचे अधिकारी, पोलीस सर्वाधिक काळजी घेतात, ती कुलूप-किल्लीची. घड्याळाची किल्लीही इथं महत्त्वाची. आता घड्याळाची किल्ली गेली अन् सेल आले. सेल व बेल म्हणजे इथलं नियंत्रण. तुरुंगात तासा-अर्ध्या तासाला टोले का? तर ते यंत्रणा जागी व कार्यरत असण्याचं प्रतीक! किल्ल्यांचा जुडगाच तुम्हाला तुरुंगात दिसणार! एकेरी किल्लीची रिंग तुम्हाला शोधून सापडणार नाही. प्रत्येक जुडग्यात एकच किल्ली चालणारी असते हे का? तर कैद्यांनी किल्ली पळवली तरी चालविण्याच्या खटाटोपीत तो पकडलाच जातो. या एकट्या एका युक्तीवर तुरुंग चालतो, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कोणतंही कुलूप उघडणारा अट्टल घरफोड्याही इथे गारद होतो. अशा अनेक ग्यानबाच्या मेखीत तुरुंग अभेद्य असतो.
 कायद्याचे राज्य न्याय, पोलीस व तुरुंग यांच्या समन्वयातून चालतं, हे जरी खरं असलं तरी आपलं तुरुंग प्रशासन मनुष्य बळ, प्रशिक्षण, साधनं, उपकरणं यांच्या दृष्टीनं अजून मागासच म्हणावं लागेल. सिंगापूर, हाँगकाँग,

निराळं जग निराळी माणसं/५६