पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. सारे बंदी कधीच एकत्र येत नसतात. कार्यक्रम इत्यादी अपवाद; पण त्यातही दक्षता, आपत्कालीन व्यवस्थापन असतंच. त्यातूनही प्रसंगपरत्वे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतोच; पण तो अपवाद असतो. अगदी बळाचा वापर करण्याचेही प्रसंगही उद्भवतात.
 तुरुंगातील बंदिजनांचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून मानवाधिकार आयोग, ऍम्नेस्टी इंटरनॅशनल, प्रयासासारख्या संस्था भरपूर प्रयत्न करत असतात. न्यायालयेही लवकर न्याय मिळावा म्हणून भरपूर प्रयत्न करतात. बंदिजनांना आपल्या खटल्याचा निकाल लागावा म्हणून किती ओढ असते म्हणून सांगू? नुसती खटल्याची तारीख लागली तरी त्यांची आशा पालवते. कधी पोलीस बंदोबस्त आला नाही, कधी साक्षीदार आला नाही, कधी पुराव्याचं साहित्य आलं नाही, कधी वकिलांनी पुढची तारीख घेतली म्हणून तारीख होत नाही; पण तारखेला जायला मिळणं यातही पण किती समाधान असतं ते अनुभवायचं तर जावे त्याच्या वंशा...तेव्हाच कळे!
 तुरुंगातलं बंदिजनांचं जीवन सुखकर व्हावं, असा तुरुंग प्रशासनाचा प्रयत्न असतो. मुखमार्जन, प्रात:र्विधी, स्नान, योगा, न्याहारी, उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण, उत्पादन, पारिश्रमिक (बंदी पैसे मिळवतात) कँटीन, बेकरी, दवाखाना, खेळ, टी.व्ही., वर्तमानपत्रं, मासिकं, ग्रंथालय, विश्रांती, झोप सारं कसं नियमित; पण नियंत्रित असतं. अनेक जणांचे विकार शमतात, तर अनेकांना नवे उद्भवतात (विशेषतः मानसिक, भावनिक) अनेकांचं वजन वाढतं तर काहीजण खंगतात, झुरतात. सारं एका चक्रात सुरू असलं तरी आपण तुरुंगात आहोत, या जाणिवा मात्र पुसल्या जात नाहीत. त्या व्यवस्थेचं ते काम पण असतं. गिनती, बंदी, परिपाठ यातून ते आपसूक जाणवत राहतं.
 बंदिजनांसाठी तुरुंग प्रशासन सण, उत्सव, क्रीडामहोत्सव, व्याख्याने, आरास सारं करत राहतं. पण त्याला बंधनांची चौकट असतेच असते. त्यातूनही तुम्हास रमण्यास वाव असतो. तुरुंगात राहून तुम्हाला शिकता येतं. परीक्षा देता येतात. तुरुंगातून पदवीधर, एम.ए., पीएच्.डी. झाल्याची उदाहरणं आहेत. तुम्ही लिहीत असाल तर पुस्तकं प्रकाशित होतात. उदा. 'गजाआडच्या कविता' तुम्ही शिक्षक असाल तर तुरुंगात शिकवता येतं. डॉक्टर असाल, तर उपचार करता येतात. छंद जोपासता येतात. विदेशांच्या तुलनेने आपले तुरुंग अजून बंदिस्त, पारंपरिक आहेत. अमेरिका, नॉर्वेसारखे तुरुंग व्हायला आपल्याला अजून बराच प्रवास करावा लागेल. त्यासाठी अपराध्याकडे 'माणूस' म्हणून पाहण्याचं समाजमन आपणास प्रयत्नपूर्वक तयार करायला हवं. त्यासाठी

निराळं जग निराळी माणसं/५५