पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सॅल्युट, यस सर सारं असेल पण ते या सोपस्कारांसह! अधिकारी, पोलीस, कर्मचारी, बंदी, वाहनं साऱ्यांची नोंद होणार म्हणजे होणार. यातून एक गोष्ट नोंदवली जाते... तुम्ही नियम, बंधनाच्या जगात येत आहात. तुमचं स्वातंत्र्य, लोकशाही, भावना, विवेक साऱ्याला प्रवेशच विराम देतो.
 इथलं बंदिजनांचे जीवन म्हणजे दोन वॉरंटमधलं जगणं. इथे कुणालाही कोर्ट वॉरंटशिवाय ना प्रवेश, ना सुटका. कोर्टाची तारीख, दवाखाना, बदली, रजा, पॅरोल, जामिनावर सुटका सारं चालतं न्यायालयाच्या आदेशावर व तुरुंग नियमावली (जेल मॅन्युअल) च्या आधारे. बंदी दोन प्रकारचे असतात. शिक्षा होण्यापूर्वीचे संशयित, गुन्हा दाखल, न्यायप्रविष्ट रिमांड वरील इ. ते उपतुरुंगात प्रतीक्षा कालावधीसाठी ठेवलेले असतात. सबजेल, सेंट्रल व रिजनल जेल सर्वत्र नियम, अनुशासन, कार्यपद्धती एकच. बदल असतो. निवासकाळ, निवास स्वरुप यांचा. शिक्षेचं गांभीर्य, अपराधाचं स्वरुप, अपराध्याची वृत्ती या साऱ्यांवर अंतर्गत विभाजन अवलंबून असतं.
 आतल्या कोठड्याही वेगवेगळ्या असतात. कठोर, अपराधी, दहशतवादी, क्रूर वृत्तीचे गुन्हेगार यांच्यासाठी असते ‘अंडा बरॅक' तिथं तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीच दिसत नसतं. जे दिसतात ते तुमच्यासारखेच पण अपवाद! इन मीन तीन! जेवणं, झोपणं, फिरणं छोट्या बरॅकच्या फेऱ्यात. घाण्याच्या बैलासारखं! फिरून तिथेच. सूर्यप्रकाश दिसला तरी ब्रह्मानंद व्हावा, अशी स्थिती! माणसास सर्वांत मोठी शिक्षा फाशी नाही... एकटं ठेवणं. असं माझं अनुभवांती मत झालं आहे. यापेक्षा कमी; परंतु जन्मठेप आजीवन कारावास, खून, दरोडे असे भयंकर गुन्हे केलेले बंदी असतात त्यांनाही एकेकटंच ठेवलेलं असतं. पण जग दिसतं. थोडा वेळ अंगणात, व्हरांड्यात रोज पहाऱ्यात असली तरी फिरण्यास मोकळीक असते. काही सामूहिक गुन्हेगार असतात. टोळीतलं, टोळी करून गुन्हे करणारे. त्यांना सर्वांना एका बरॅकमध्ये ठेवलं जातं. ते एकमेकांचे मित्र, सहकारी असतात. गुण्यागोविंदाने राहतात. वेगवेगळ्या टोळ्यांत वैर, ईर्षा, द्वेष, स्पर्धा, बदला सारं असतं. त्यातून सुटायचा, वाचायचा हाच रामबाण उपाय असतो. बगळे, पोपट, कावळे, चिमण्या असोत वा वाघ, सिंह, हत्ती, हरीण साऱ्यांचे थवे झुंडी, कळप असतात. निसर्ग नियम इथे श्रेष्ठ व सोयीस्कर ठरतो. तुरुंगाच्या साऱ्या प्रशासन, नियम, शिस्त इ. मागे मानसशास्त्र, व्यवहार, मनुष्यवर्तन, तर्क, खबरदारी सारं सारासार विचार करून ठरवलेलं असतं. मग शिवाय सर्वसाधारण बंदी बांधवांच्या बराकी असतात. बराकीचे पण सेल

निराळं जग निराळी माणसं/५४