पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सुट्टीत मी पंढरपूरला जात असे. तिथे आश्रमात तुरुंगातल्या बायकांचा विभाग होता. त्या काळात तुरुंगात स्त्रियांना ठेवायची स्वतंत्र सोय, कर्मचारी असा आजच्यासारखा मामला नव्हता. त्यामुळे शिक्षा झालेल्या बायका आश्रमात ठेवलेल्या असायच्या. पोलिसांनी पकडले, या कल्पनेने त्या पुरत्या गारद असायच्या. पळून जाणे दूरच. जीव मुठीत घेऊन राहायच्या. अबोल असायच्या इतर बायकांत त्या फारशा मिसळतही नसत.
 पण मी तुरुंग पहिल्यांदा आतून पाहिला ते मोठा झाल्यावरच. सन १९८० ला मी रिमांड होमचं काम पाहू लागलो तेव्हा तुरुंगातील बंदिजनांची मुले (काही शिक्षा झालेली, काही आई-वडील तुरुंगात असल्याने निराधार असलेली) आमच्या रिमांड होममध्ये असत. त्यांच्या काही प्रश्नांसंदर्भात मी पदाधिकारी म्हणून पहिल्यांदा बैठकीच्या निमित्ताने गेलो असताना तुरुंग आतून पाहिला अन् लक्षात आलं की, हे प्रकरण रिमांड होमपेक्षा भयंकर आहे. तिथलं प्रशासन, शिस्त, नियम, परंपरा साऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी 'माणूस' जीवनास हादरवणाऱ्या वाटल्या होत्या. मग जेलमध्ये येणं-जाणं नित्याचं झालं अन् मी जेलशी एकरूप होऊन गेलो.
 शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. सभ्य माणसास पोलीस ठाण्यात जावं लागू नये, तद्वतच कोणासच कारागृहात जायची वेळ येऊ नये, असं राष्ट्रीय आयोगाच्या जिल्हा प्रतिनिधी पदाच्या गेल्या पंधरा वर्षांच्या अनुभवावरून माझं मत बनलं आहे. कारण हे जग आपण रोज जगतो त्या जगापासून सर्वस्वी निराळे, तुटलेलं, माणुसकी नसलेलं असं जग आहे. न्यायाधीश, पोलिस, डॉक्टर, जेलर यांना भावनावश न होता आपल्या, अंगीकृत कार्यास बांधील राहून काम करायचं असतं. ती त्या पदाच्या अधिकार व कर्तव्याची पूर्व अटच असते म्हणा ना.
 कारागृह मला समाजातलं तुटलेलं बेट वाटत आलंय. जगातले अनेक तुरुंग बेटांवरच आहेत. उदाहरणार्थ, आपलं अंदमान कारागृह, म्हणजे तुम्ही रोज सहज जगता त्या अधिकार, विचार, भावनांचा तिथे संकोच असतो. ते जग तुम्ही जगता त्या जगापेक्षा कितीतरी भिन्न असतं. म्हणून तर ते उंच तटबंदीत बंदिस्त असतं. काही कारागृहांच्या बाहेर खंदकही असतात. कालपरत्वे ते मुजलेत इतकेच. पहिली गोष्ट अशी की, कारागृहात अधिकृततेशिवाय प्रवेश नसतो व बहिर्गमनही! कोणीही येवो, जावो याची नोंद होणारच! कोण, कुठला, कशाला आला, किती वेळ होता, कुणाला भेटला, परत केव्हा गेला, जाताना काय घेऊन गेला, याची बारीक तपासणी, नजर हे इथलं वैशिष्ट्य. मी गेलो तरी याला अपवाद नाही. तुम्ही अधिकारी म्हणून गार्ड ऑफ ऑनर,

निराळं जग निराळी माणसं/५३