पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणुसकीची मुक्तांगणं : तुरुंग

 'तुरुंग' शब्दाची माझी ओळख १९५९-६० ची. मी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमातून बदली होऊन कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो होतो. या रिमांड होमच्या शेजारी पद्माळा रेसकोर्सचा परिसर होता. पूर्वी तिथे रेसेस चालत. त्या रेसचा ट्रेक एका तळ्याभोवती होता. ते तळे पद्माळा तळे नावाने ओळखले जायचे. ते कालपरत्वे आटले होते. तिथं कळंबा कारागृहाचे, जेलचे कैदी शेती करीत. म्हणून त्याला कैद्यांचे तळेही म्हटले जायचे. रिमांड होममधून ते कैदी, वॉर्डन, पोलीस मी नेहमी शेती करताना पाहात असे. शिवाय शाळेला जायचा रस्ता म्हणजे रेसकोर्स, रेसराऊंड. तिथून जाता-येता कैदी दिसत. सकाळी ८ वाजता ते येत सायंकाळी ६ वाजता परत जात. त्यांचं नि आमचं जाणं-येणं, गणवेश बरंच साम्य असणारं. ते ओळीत येत-जात, आम्हीपण. त्यांच्यापुढे मागे पोलीस, आपल्यापण पुढे-मागे संस्थेचे हवालदार, खाकी वर्दीतलेच. ते अनवाणी, आम्हीही. त्यांचा गणवेश हातमागाचा, आमचाही. त्यांचं चम्मन, आमचेही. ते मोठे भाऊ, आम्ही धाकटे. त्यामुळे उगीचच त्यांच्याबद्दल माझ्या मनात बंधुभाव होता.
 एकदा कात्यायनीला रिमांड होमची सहल गेली होती, तेव्हा कळंबा जेल बाहेरून पाहिलं. रिमांड होमसारखंच होतं. पुढे मोठा दरवाजा. त्याला छोटं विकेट गेट. चारी भोवताली उंच भिंती. खोल्यांना कुलूप. सारा मामला कळंबा जेलसारखाच रिमांड होममध्येही होता. त्या वेळी बेल, ध्वज, पहारेकरी, बाग सारं साम्य असणारं अधिक.

निराळं जग निराळी माणसं/५२