पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येतात. हे समाज संक्रमण शक्य झालं ते तेथील कार्यकर्ते व शिक्षकांच्या दृष्टिकोनामुळे. इथलं सुसंस्कार विद्यालय शहराच्या अनेक स्पर्धात प्रथम येतं. हे मोठं सामाजिक स्थित्यंतर नव्हे का?
 पूर्वी संकुलातील सर्व मुलं-मुली शेजारच्या एकाच शाळेत जात. त्यामुळे त्या शाळेवर व मुलांवर एक प्रकारचा सामाजिक कलंक असायचा. आता मुला-मुलींना शहरातील विविध शाळांत त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. घर, समाजातील मुलं व संस्थेतील मुलं यांच्या केशरचना, कपडे यात पूर्वी प्रथमदर्शनी फरक असायचा. (कपडे एकाच प्रकारचे, दफ्तरासाठी एकाच प्रकारची पिशवी, मुलं अनवाणी, चेहरे मख्ख इ.) आता हा फरक दिसत नाही. मुली बॉबकट, बॉयकट, आयब्रो केलेल्या, बूट इ. युक्त गणवेश नसेल तेव्हा प्रत्येकाचे पोशाख वेगळे. यातून संस्था त्यांचं वेगळेपण जपते. त्यामुळे संस्थातली मुलं आता समाजातील एक बनली आहेत.
 प्रारंभी उद्योग शिक्षणच पुरेसं मानलं जायचं. आता उद्योगाबरोबर औपचारिक शिक्षण व तेही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवड, कल यानुसार. संस्थेत ज्ञानरंजन केंद्र आहे. मुलं बालवाडीतच मल्टीमीडिया, व्हर्च्युअल गेम्स खेळू लागतात. शाळा संपली की, कॉलेजात जातात. 'जे घरी ते संस्थेत' असा प्रघात रूढ झालाय.
 मुलींची लग्नं पूर्वीही संस्थेत व्हायची. पण त्यांना समाजमान्यता नसायची. आज लग्नाला लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय उच्चाअधिकारी, हितचिंतक येतात. पोलीस बँड, हळद, मेंदी, गजरे, पटके, मिष्टान्न असं सारं असतं. ओटी भरणं, डोहाळे, माहेरपण, दिवाळी सणही! हे नवे बदलच अशा संस्थांना मातृमयी संस्था करते झाले.
 आज आपण एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक मागे सारून जागतिकीकरणाला सामोरं जात आहोत. जगात अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संस्था हळूहळू बंद झाल्यात. आपण मात्र संस्थेला चिकटून आहोत. हे बदलायला हवं. आपल्याकडील सर्व संस्था इंग्रजांच्या अनुकरणाने आल्या. आज इंग्लंडमध्ये अनाथ, निराधारांच्या निवासी संस्था नाहीत. त्यांनी या कार्याचं नवं तत्त्वज्ञान, नवी यंत्रणाच विकसित केली आहे. प्रश्न समाजात निर्माण होतात. समाज ते निर्माण करतो. तर ते सोडवायची जागा समाजच असायची हवी. ते प्रश्न समाजानेच सोडवायला हवेत. तिथं प्रश्न आजही आहेतच. त्यांनी संस्थाबाह्य, समाजसहभाग असलेल्या सेवा विकसित केल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर एक कुमारीमाता आहे नि तिचं बाळ

निराळं जग निराळी माणसं/५०