पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडक्या जागेत सुरू होत्या. अनाथाश्रम व रिमांड होम योगायोगाने हुजूर पागा नि रेसकोर्स पागा अशा घोड्यांच्या तबेल्यात सुरू झाली. या संस्थेत त्या काळी हुजूर स्वारी, ब्रिटिश रेसिडेंट्स, नंतरच्या काळात रोटरी सदस्य असे तत्कालीन उच्चभ्रू प्रासंगिक भेटी, मदत देऊन आपण या वर्गाचे उपकारकर्ते कसे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत. सर्वसामान्यांच्या लेखी या संस्था अस्पृश्य होत्या. समाजातून तुटलेलं बेट, अशी त्यांची स्थिती असायची. हे चित्र सर्वत्र असायचं.
 अशा संस्थांत औपचारिक शिक्षणास अघोषित मज्जाव असायचा; कारण संस्थेतल्या मुलं, मुली, महिलांना बाहेर सोडलं जायचं नाही. समाज बहिष्काराचे बळी ते...काळ किती विचित्र पाहा. खरे अपराधी प्रतिष्ठित मुक्त...शिक्षा बळींना! त्यांना संस्थेतच शिवणकाम, विणकाम, शेती, कुक्कुटपालन, स्वयंपाक शिकवून स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जायचा. दत्तक, विवाहाचे प्रयत्न व्हायचे; पण समाज प्रतिसाद थंडा असायचा. स्वातंत्र्यानंतर समाजजीवन शिक्षित झालं; पण संस्थांतली मुलं-मुली समाजात जायला, शिकायला लागल्या त्या देश स्वतंत्र झाल्यावरच. स्वातंत्र्यानंतर एक बरं झालं...अनाथ व बालगुन्हेगार जे पूर्वी एकत्र सांभाळले जायचे त्यांच्या स्वतंत्र संस्था झाल्या. सर्टिफाइड स्कूल सुरू झाली. अनाथ, निराधार मुलं शिकू लागली. अजून बालगुन्हेगारांना तुरुंगाप्रमाणेच डांबलं जातं. काही ठिकाणी मात्र शिकवलं जातं.
 आज अशा संस्थांनी कात टाकली आहे! कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाचंच पाहा ना. पूर्वी अनाथ, अनौरस अर्भकं टाकली जायची. संस्थेने केलेल्या प्रबोधनामुळे हे बंद झालं. कुमारीमाता येते नि रीतसर, कायदेशीर बाळ देऊन जाते. पूर्वी अशी टाकलेली बाळं जगणं मुश्कील असायचं. आता अशा मुलांचे मृत्यू प्रमाण रोखण्यात संस्थेस चांगलं यश आलं आहे. ते सुविधा, विकास, यंत्रणा उभारणी व सेवाभावी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे. शिवाय अशी बाळं पूर्वी दत्तक पालकांच्या प्रतीक्षेत मोठी होत. आता लहानपणी, काही महिन्यांची असताना दत्तक जातात. घरी रुळतात. त्यांचा सांभाळ घरात होतो. नाती पण लवकर दृढ होतात. जी संस्थेत राहतात त्यांच्यासाठी भरपूर खेळणी, बालवाडी अशा गोष्टींची सोय असल्यानं ती आनंदी वातावरणात वाढतात.
 बाल संकुलानं संस्थेतच बालवाडी व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. पूर्वी कोवळ्या वयात या मुलांना समाजाच्या टक्क्याटोणप्यांना सामोरं जावं लागायचं. आज परिस्थिती बदलली आहे. समाजातील मुलं संकुलाच्या शाळेत

निराळं जग निराळी माणसं/४९