पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा सर्वांचा सांभाळ होत असे. ती खासगी संस्था होती. त्यामुळे मुलांसाठी रिमांड होम सुरू झाल्यावरही ज्या उनाड, बालगुन्हेगार मुली यायच्या, अर्भकं यायची त्यांचा सांभाळ अनाथाश्रमातच होई.
 १९९० ला स्वतंत्रपणे एकाच प्रकारचं काम करणाऱ्या या दोन संस्थांचं विलीनीकरण झालं आणि त्यातून आजचं कोल्हापूरचं 'बालकल्याण संकुल' साकारलं. आज कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात वात्सल्य बालसदन (अर्भकालय), मुलांचं बालगृह, मुलींचं बालगृह, डॉ. राधाकृष्णन निरीक्षण गृह, डॉ. सौ. अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृह, सुसंस्कार केंद्र, ज्ञानरंजन दत्तक केंद्र, उद्योग केंद्र, ग्रंथालय, दवाखाना, समुपदेशन केंद्र सारं काही आहे.
 या संकुलात आज एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृद्धेपर्यंत सुमारे ३०० मुलं, मुली व महिलांचा सांभाळ केला जातो. गेल्या ७४ वर्षात संस्थेनं सुमारे दहा हजार जणांचा केवळ सांभाळच केला नाही तर त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणून सन्मानित केलं.
 बालकल्याण संकुलाच्या समन्वित कार्याचा २०१२ मध्ये अमृत महोत्सव येतो आहे. या पंच्याहत्तर वर्षांत संस्थेनं अनेक बदल पाहिले. या काळातील इतिहासाची पानं पलटताना लक्षात येतं की, या संस्थेनं महाराष्ट्राच्या समाज जीवनात मोठं स्थित्यंतर आणलं. ज्या सामाजिक संस्थांना दूरदर्शी नेतृत्व लाभतं त्याच मूलभूत स्वरूपाचं कार्य करू शकतात. महात्मा फुले, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पंडिता रमाबाई ही नावं या संदर्भात आठवतात. मुळात कार्यकर्त्यांत शिक्षक असावा लागतो. अमृत महोत्सवी काळात कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाचं प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, प्रा. एन. जी. शिंदे, प्रा. डी. एम. चव्हाण, प्रा. सुरेश शिरोडकर यांनी वेळोवेळी नेतृत्व केलं म्हणून ही संस्था मातेचं कार्य करती झाली. ज्या संस्था काळाबरोबर कार्य, स्वरूप बदलतात त्या टिकतात. सामाजिक संस्थेचा इतिहास एका अर्थानं काळाचं कठोर प्रतिबिंब असतं.
 करवीर अनाथ हिंदू महिलाश्रम १९३७ मध्ये स्थापन झाला. तो करण्यात पुढाकार होता तत्कालीन हिंदू महासभेचा. प्रिन्सिपॉल दाभोळकर, चित्रपती भालजी पेंढारकर त्या सभेचे कार्यकर्ते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उपस्थितीत एका मुस्लीम महिलेच्या धर्मांतराने या संस्थेचा आरंभ झाला. सावरकर तेव्हा अंदमानमधून सुटून रत्नागिरी, कोल्हापूरमार्गे मुंबईस निघाले होते. जागोजागी त्यांचे सत्कार होत व सत्कार्याचा प्रारंभही. त्या काळात अशा संस्था जुन्या

निराळं जग निराळी माणसं/४८