पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलं सुट्टीत दिवाळी, मेमध्ये येत. त्यातून कधी अपघाताने भावा-बहिणी पलीकडचं ओढीचं नातंही तयार व्हायचं. नियम होते; पण त्यांचा काच नव्हता. चौकट होती ती माणूस घडणीची, माणूस जोडायची. त्यामुळे इथे कुणी-कुणाचे रक्ताचं नसलं तरी जिवाभावाचं मानलेलं सर्व सर्वांचे असायचे. या नात्याचं एक बरं असायचं. ते लादलेलं नसायचं...जन्मानं! जोडलेलं असायचं ...मनानं! त्यामुळे रक्त नि पाण्यापलीकडे जाऊन ‘ब्लड इज थिकर दॅन वॉटर'ला खोटं ठरवणारं. पराभूत करणारं ठरायचं! आज अशा हजारो मुलामुलींचं महाराष्ट्रात एक नवं गोकुळ तयार आहे. समाज परिघाबाहेरचं माणुसकीचं नातं!
 हे जग बघून स्वातंत्र्यवीर सावरकर गहिवरले होते. म्हणाले, '...ती ठेच लालशंकर त्रिवेदींना लागली नव्हती... समाजाला लागलेली ठेच होती ती!' वि. स. खांडेकर आश्रमासाठी न चुकता १० रुपये 'भाऊबीज' पाठवायचे. तेव्हा संपादक त्यांच्या दिवाळी अंकाच्या कथेस ५ रुपये मानधन देत असायचे. अशीच वार्षिक मदत खांडेकर अमरावतीच्या शिवाजीराव पटवर्धनांच्या कुष्ठधामास (दत्तपूर) पाठवत. कुसुमाग्रजांनी 'नटसम्राट' मध्ये बेलवलकरांच्या एका संवादात म्हटलंय... 'मुलांसाठी अनाथाश्रम काढलात तसा अनाथ आई बापांसाठी काढा माय बाप हो!' या आश्रमानं देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून राज्यपालापर्यंत सर्वांना त्यांचे घरगुती प्रश्न सोडवायला, त्याची पोकळी भरून काढायला, कूस भरायला मदत केली आहे. अनेक 'विश्वामित्रां'ची प्रतिष्ठा याच आश्रमानं पोटात घेऊन त्यांना सामाजिक अभय दिले. तर किती तरी अप्सरा, शकुंतला, मेनका, कुंतींना त्यांचे भोग वाचवून त्यांना समाजात गर्त्या गृहिणी म्हणून उजवलं! यशोदा, देवकीचा खेळ, फेर... या आश्रमांनी वर्षानुवर्षे जपला. कृष्ण वाढला इथे... कंस नाही! या आश्रमांनी किती भूमिगत कुमार संभव पचवले! इथून कर्ण निर्माण झाले नि कर्नलही! इथून डॉक्टर, नर्स, प्राध्यापिका झालेल्या मुलींनी एके काळी मुंबई, महापालिकेचं शाळांचं, हॉस्पिटल्सचं प्रशासन सांभाळलं. अधिकारी होऊन! मुलं पत्रकार, लेखक, शिक्षक, संशोधक, इंजिनिअर, उद्योगपती, सेनाधिकारी झाले अन् टर्नर फिटर होऊन त्यांनी समाजाला 'टर्न' दिला नि 'फिट' ही केलं! सामाजिक संस्थेचे मोठेपण ती किती जणांचा सांभाळ करते यापेक्षा ती किती जणांना जबाबदार नागरिक बनवते या कसोटीवर जोखायचं झालं, तर पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमानं शेकडो... हजारो मुलं, मुली, महिलांना...ज्यांना समाजाने त्यांचं माणूसपण हिरावून घेतलं होतं ते बहाल करून त्यांना समाजभूषण बनवलं. या एकाच निकषावर या आश्रमाचा समाज कायमपणी देणेकरी ठरतो!

निराळं जग निराळी माणसं/४५