पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य सम्राट न. चिं. केळकर, जेम्स फर्ग्यूसन (तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर) राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, राज्यपाल श्रीप्रकाश, श्रीमती इंदिरा गांधी, आचार्य अत्रे, ज्ञानपीठ विजेते पद्मभूषण वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज (ज्यांनी इथं प्रेरणा घेऊन नटसम्राट लिहिलं) यांसारखे असंख्य मान्यवर सद्गदित झाले.
 अशा या संस्थेत मी १९५० ला जन्मलो. ही संस्था नसती तर हजारो (अक्षरशः) अनाथ, निराधार मुले, मुली, कुमारी माता, परित्यक्ता, वृद्धा, बंदी स्त्रीया यांचं काय झालं असतं, या विचारानं आजही मती गुंग होतेय. या संस्थेनं केवळ हजारो मुलं, मुली, महिलांना सांभाळलंच नाहीतर त्यांना 'माणूस' बनवून समाजाच्या मध्यप्रवाहात आणलं!
 दुस-या महायुद्धापासून ते आणीबाणीपर्यंतचा काळ हा संस्थेचा उत्कर्ष काळ होता. या काळात संस्थेत अर्भकालय, कुमारीमाता, परित्यक्ता आधारगृह, बालगृह, निरीक्षणगृह, रुग्णालय, प्राथमिक शाळा, बालमंदिर, ग्रंथालय, प्रसूतिगृह, प्रमाणित शाळा, उद्योगशाळा, कलानिकेतन, सारं... सारं होतं. त्या सर्वांपेक्षा या काळात ही संस्था 'घर' होती.
 अनाथ अर्भकं कितीही आली तरी त्यांचा सांभाळ डोळ्यांत तेल घालून व्हायचा. सांभाळासाठी कुमारी माता, परित्यक्ता व्यक्तिगत दु:खं विसरून जिवाचा दिवा करायच्या. नर्स, मेट्रन, डॉक्टरांची योजना होती. २४ तास निगराणी होती. बालमृत्युचं प्रमाण अल्प होतं. कुमारी माता, परित्यक्तांना त्यांचं दु:ख विसरावं, त्यांना नवं जग, माणसं, नाती मिळावी म्हणून त्यांना संस्थेत मुलं-मुली सांभाळायला दिल्या जायच्या. मग आई, मावशी, काका, ताई, दादाचा गोफ गुंफला जायचा. हवं नको, दुखलं-खुपलं बघितलं जायचं. न्हाण जपलं जायचं. मुलं बालवाडीत जाण्यापूर्वीच बडबड गीते एकमेकांचं ऐकून म्हणून लागायची. मोठ्या मुली... ताई, दीदी लहान मुलांना... 'चाल चाल मोते, पायात काटे' म्हणत रांगत्या पायांना चालतं करायच्या. मुलं मुली बालवाडीतून शिकली की, बाहेरच्या नगरपालिकेच्या शाळेत जात नि मग त्यांना आश्रमाबाहेरचं खरं जग दिसायचं... समजायचं. नवे मित्र-मैत्रिणी मिळत. समाजाचं ती अंग बनत. मुलं १० वर्षांची झाली की मुंबई, वाई, मालाड, जांभूळ, कोल्हापूर इ. ठिकाणच्या संस्थात जात. संस्थेत मुली राहात. त्या शिकत मोठ्या होत. मग दाखवणं, साखरपुडा, विवाह, डोहाळे, बारसं, मंगळागौर, दिवाळ सण, माहेरपण, बाळंतपण, नागपंचमी, रंगपंचमी सारं सारं व्हायचं. अगदी एकुलत्या मुलीच्या थाटात सर्वांचं तसंच पार पडायचं. संस्थेत दीर, भावोजी, मामंजी, मामी पण सासरहून भेटायला येत. इतर संस्थेत गेलेली

निराळं जग निराळी माणसं/४४